नाना पटोलेंवर एकाधिकार शाहीचा आरोप…..!

By Anant Nalavade

Twitter: @maharashtraciy

मुंबई: काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टार्गेटवर असल्याचे दिसत असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत पक्षातील एका शिष्टमंडळाने दिल्लीत तळ ठोकला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या अडचणी सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी अशी पाऊले नेमकी का उचलली याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशात पटोलेंनी चंद्रपूरमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तातडीने हकालपट्टी केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी असं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे.

पटोलेना हटवण्याची विनंती

नाना पटोले यांना हटवण्याची विनंती केली जात आहे. यासाठी राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे, अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

तक्रारीत काय म्हटलंय  ?

राज्यातील कोणत्याही नेत्याशी पटोले यांचा समन्वय दिसत नाही. ते एकटेच पुढे जातात, कोणालाही विचारत नाहीत किंवा बरोबर घेत नाहीत. पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावेच लागेल,असं शिष्टमंडळाचं मत असल्याचंही सांगण्यात आले.

शिष्टमंडळाच्या गाऱ्हाण्यांवर खर्गे नक्की काय म्हणाले?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीचे गठण झाल्यावर तातडीने महाराष्ट्राबाबत विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय देण्यात येईल,असं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here