आढावा रायगड लोकसभा मतदारसंघाचा

Twitter : @ManeMilind70

मुंबई 

रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना 2019 च्या निवडणुकीत पराभूत करून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची आगामी खासदारकीची वाट खडतर असेल. याला कारण स्वयं तटकरे यांचा तुटलेला जनसंपर्क, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा  मंतदारांशी नसलेला संपर्क, विरोधात गेलेले शेतकरी कामगार पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील तीन आमदारांचा विरोध  ही करणे असतील, असा दावा केला जात आहे.  

सुनील तटकरे यांनी सुमारे 31 हजार 255 मतांची आघाडी घेत शिवसेनेचे तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना धूळ चारली होती. त्यानंतर पुढे वर्षभर सुनील तटकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर संपर्क ठेवला.  मात्र, त्यानंतर कोविडच्या दोन वर्षात श्रीवर्धन, महाड आणि पेण विधानसभा मतदारसंघ वगळता अलिबाग, दापोली व  गुहागर या मतदारसंघातील संपर्क पूर्णपणे कमी झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तटकरे यांनी या मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने आजपर्यंत पूर्ण झालेली नाही, अशी सार्वत्रिक तक्रार आहे. 

खासदार सुनील तटकरे यांची कन्या आणि श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आलेल्या अदिती तटकरे यांचा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. परंतु रायगड जिल्हा आणि त्यातल्या त्यात श्रीवर्धन व पेण हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता त्या अन्यत्र प्रभाव पाडू शकल्या नाहीत. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना बसू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

कोकण शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे पर्यायाने शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शेका पक्ष व तटकरे यांच्यात मोठ्या प्रमाणावर दुरावा निर्माण झाला आहे. ज्या शेतकरी कामगार पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत केली, त्याचा फायदा बाळाराम पाटील यांना झाला नाही. पर्यायाने शेकापक्ष तटकरेंपासून दुरावला आहे.  याचाही फटका तटकरेंना बसू शकेल. 

Sunil Tatkare with Dy Chief Minister Ajit Pawar (Photo source – NCP social media)

रायगड लोकसभा मतदारसंघ हा अलिबाग पासून गुहागर व गुहागरपासून पेण अशा तीनशे किलोमीटरच्या पट्ट्यात पसरला आहे. विस्ताराने मोठा असलेल्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरणारे तटकरे कालांतराने मतदारसंघात संपर्क न  ठेवणारे झाले. त्यांचे कार्यकर्ते देखील दिशाहीन झाले. हे दिशाहीन कार्यकर्ते फक्त “साहेब” आले की साहेबांच्या पुढे पुढे नाचण्याचे काम करीत राहिले. मात्र मतदारसंघातील आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, शाळा, कॉलेज, वाढती बेरोजगारी याबाबत त्यांनी कधीही आंदोलने केली नाही आणि या प्रश्नाबाबत कधीही जनतेमध्ये जाऊन जनतेची मते जाणून घेतली नाहीत.

लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मागील चार वर्षात तटकरे यांनी लेखाजोखा मांडल्यास तो शून्य असा येऊ शकतो, एवढी गंभीर परिस्थिती रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरेंच्या जनसंपर्कहीन झाल्यामुळे झाली आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे तटकरेंचे मित्र, माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.  त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात तटकरेंना पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात तोटा सहन करावा लागू शकतो. 

गुहागर विधानसभा मतदारसंघात मागील वेळेस तटकरे यांना केवळ 502 मतांची आघाडी मिळाली होती. तटकरेंचे विरोधक आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांचे तटकरेंशी कधीच सुर जुळले नाहीत.  त्यात  आता तटकरे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवार गटात गेल्याने तटकरे यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Map of Raigad Lok Sabha Parliamentary Constituency (Source – National Informatics Centre – NIC)

महाड विधानसभा मतदारसंघात मागील वेळेस तटकरे यांना आठ हजार मतांचा फटका बसला होता. तीच परिस्थिती या मतदारसंघात कायम राहू शकते. कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर तटकरेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिंदे गटात गेले आहेत. 

अलिबाग मतदार संघात मागील वेळेस तटकरे यांना 18,262 मतांचा फटका बसला होता.  त्यावेळेला शेकापक्ष हा शेतकऱ्यांच्या बरोबर होता. तरी देखील तटकरे यांना मोठा दणका बसला होता. आता तर शेकापक्ष तटकरेंपासून फार दुरावला आहे. 

पेण विधानसभा मतदार संघाचा बहुतांशी भाग हा तटकरेंच्या रोहा व सुतारवाडी पर्यंत येतो. या मतदारसंघात तटकरेंचा प्रभाव असताना आणि तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाने साथ देऊन देखील अनंत गीते यांना 2016 मतांची आघाडी मिळाली होती. 

श्रीवर्धन मतदारसंघ हा तटकरेंचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 37 हजार 744 एवढ्या मतांची  आघाडी मिळाल्यामुळे तटकरे हे 31 हजार 225 मतांनी विजयी झाले. यापुढेही तटकरे यांची भिस्त केवळ श्रीवर्धनवर अवलंबून आहे. 

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मागील वर्षभरात रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरे यांचा जनसंपर्क फार कमी झाला आहे. केवळ सुतारवाडीला येणारा कार्यकर्ता हा स्वतःला “साहेबां”चा निष्ठावंत समजला जातो.  मात्र, मतदारसंघात मात्र किंवा त्याच्या विभागात, जनमानसात अशा कार्यकर्त्याची प्रतिमा शून्य झाली आहे. केवळ “साहेब” आले की त्यांच्या मागे – पुढे फिरणारे पदाधिकारी व कार्यकर्ता यांना मतदानाच्या रूपातच धडा मिळणार आहे. मात्र त्याचा फटका तटकरेंना बसू शकतो. 

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवार यांच्याकडेच राहिल की अजित पवार यांना मिळेल याबाबत अजून निवडणूक आयोगाचा निकल येणे बाकी आहे. मात्र, या संदर्भात जो निकष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लावला गेले तोच राष्ट्रवादीला लावला जाईल, अशीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळेल. तसे झाले नाही तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आणि खासदार हे भाजमध्ये प्रवेश करतील का? निवडणुकीच्या वेळी भाजपचे कमळ चिन्ह घेऊन निवडणुक लढतील का? या प्रश्नाची उत्तरे मिळण्यासाठी वाट बघावी लागेल. 

दरम्यान, राष्ट्रवादी  काँग्रेसच्या फुटीनंतर सुनील तटकरे हे अजित पवार गटात गेल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. जनतेने नाकारलेले कार्यकर्ते प्रभावहीन व दिशाहीन झाले आहेत. त्यातच तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार की भाजपाच्या कमळावर हे देखील गुलदस्त्यात आहे.  जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढले तर तटकरेंना राष्ट्रवादीची निशाणी घरोघरी पोहोचवण्यात अडचण निर्माण होणार नाही. मात्र, भाजपाच्या कमळा चिन्हावर निंवडणुक लढावी लागली तर पुन्हा एकदा तटकरेंना अलिबाग ते गुहागर व गुहागर ते पेण अशा तीनशे किलोमीटरचा प्रवास गावोगावी वाड्या – वाड्यावर करावा लागणार आहे. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढल्यास तटकरेंपासून मुस्लिम समाज दुरावाला जाऊ शकतो. तसेच या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत पराभव झालेले अनंत गीते यांच्या कुणबी सेनेचा देखील फटका  तटकरे यांना मोठ्या प्रमाणावर बसू शकतो. 

सुनील तटकरे यांना ज्याप्रमाणे शेका पक्षाचा विरोध पत्करावा लागेल, तसाच विरोध त्यांना शिंदे गटातील महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या  नाराजीचा सामना करावा लागेल. 

राष्ट्रवादीच्या महाड, पोलादपूरमधील काही पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सुनील तटकरे यांनी महाड औद्योगिक वसाहत, महाड, पोलादपूरमधील नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे दिली.  त्यातून असे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. मात्र, या पदाधिकाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत वाईट आहे. त्याचा मोठा फटका तटकरेंना महाड व पोलादपूर तालुक्यात बसू शकेल. हीच अवस्था थोड्याफार प्रमाणात तटकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या  श्रीवर्धन, अलिबाग, पेण, गुहागर व दापोली या मतदारसंघात आहे. एकंदरीत काय तर मागील वर्षभराच्या काळात ज्याप्रमाणे सुनील तटकरे जनतेपासून संपर्कहीन झाले तसेच त्यांचे  कार्यकर्ते देखील संपर्कहीन झाले.  त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या  तटकरेंची खासदारकीची वाट खडतर असल्याचे या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता दिसून आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here