शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा

@maharashtracity

ठाणे: निराधार आणि बेछूट आरोप करून बदनामी करणारे भाजपचे माजी खासदार डॉ किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माफी मागितली नाही. या कारणासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी डॉ सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते.

मीरा भाईंदर मनपा (Mira Bhayander Municipal Corporation) क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास (loss of environment) करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका श्रीमती मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे (BJP) किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून सीआरझेड (CRZ) व कांदळवन (Mangroves) क्षेत्रात तब्बल १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम केले आहे.

त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत. याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती.

मुख्यमंत्री (CM), नगरविकासमंत्री (UD Minister), गृहमंत्री (Home Minister) यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर सरकारने या प्रकरणाचा अहवालही मागवला होता. याप्रकरणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिकेकडून (MBMC) अहवाल मागवला होता व पालिकेने तो अहवाल शासनाला सादर केला होता.

त्या अहवालात पर्यावरणाचा ऱ्हास करून शौचालयांचे बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) हे प्रकरण सोपवले होते व पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या.

सोमय्या यांचा शौचालय घोटाळा बाहेर निघाल्याने सोमय्या यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर खोटे आरोप करण्याची व त्यांच्या बदनामीची मालिका सुरु केली.

सरनाईक म्हणतात की, किरीट सोमय्या यांनी ठाण्यात येऊन आपल्याविरोधात धादांत खोटे आरोप केले होते. सोमय्या यांनी माझी बदनामी करणारे बॅनरही लावले होते. केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे (MVA) आमदार म्हणून केवळ राजकीय हेतूने मला बदनाम करण्यासाठी सोमय्या आरोप करीत होते.

सोमय्या यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन खोटी वक्तव्ये, खोटी विधाने त्यांच्या सोयीने केली व त्याआधारे खोट्या बातम्या समाज माध्यमात पसरवल्या. जनतेत आमदार सरनाईक यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी, त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी सोमय्या यांनी ठरवून सर्व काही केले, असा दावा आमदार सरनाईक यांनी केला आहे.

त्यावेळी सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी जाहीर केले होते. तशी नोटीस आमदार सरनाईक यांनी सोमय्या यांना पाठवली होती. बदनामी केली म्हणून माफी मागा असे नोटिशीत सांगितले होते.

सरनाईक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आमदार सरनाईक यांनी १०० कोटींचा दावा सोमय्यांच्या विरोधात दाखल केला आहे. त्यासाठी कोर्टात जवळपास ३ लाख इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.

“सोमय्या यांनी राजकीय द्वेषाची पातळी ओलांडून बदनामीचे घाणेरडे राजकारण केले आहे. बेलगाम खोटी विधाने करून त्यांनी अजेंडा म्हणून बदनामीची मोहीम सुरु केली. सोमय्या यांनी गेल्या ६ महिन्यात वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत धादांत खोटी वक्तव्ये व बदनामी केली आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. खोटी विधाने आणि बातम्यांमुळे माझ्या प्रतिमेला जो तडा गेला, माझ्या इभ्रतीला जे नुकसान पोहोचले आहे, त्या नुकसान भरपाईपोटी मी विशेष दिवाणी दावा दाखल केलेला आहे. दिवाणी दाव्याचे मूल्य रक्कम १०० कोटी इतके आकारलेले आहे.”

  • आमदार प्रताप सरनाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here