शासनाची परवानगी घेऊनच केमिकल उत्पादन – व्यवस्थापन
धुळे: वाघाडी (ता.शिरपूर) येथील रुमीत केमसिंथ मध्ये झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार व त्यांच्या वारसांना पाच लाखाहून अधिकची विमा रक्कम दिली जाईल, असे आश्वासन कंपनी व्यवस्थापन मंडळाने दिले आहे.
या दुर्घटनेत १५ ते १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करत शासनाच्या सर्वच प्रकारच्या परवानगी नंतर या ठिकाणी उत्पादन सुरू होते, असाही दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील सुभाष नगर शिवारात मे.रुमीत केमसिंथ प्रा.लि.हा उद्योग असून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. यात १३ जणांचा मृत्यू तर जवळपास ६० जण जखमी झाले आहेत.
या घटनेच्या अनुषंगाने रुमीत केमसिंथच्या व्यवस्थापन मंडळाने माध्यमांच्या माध्यमातून सहवेदना व्यक्त केल्या आहेत. उद्योगातील प्रत्येक कामगार हा आमच्या कुटुंबातील घटक होता, आहे आणि यापुढेही राहील. त्यांच्याप्रती असलेली कोणतेही जबाबदारी आम्ही नाकारलेली नाही. जखमींच्या कुटुंबाविषयी सहवेदना व्यक्त करीत आहोत.
प्रत्येक मृतांच्या कुटुंबासाठी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जातीलच. शिवाय मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांहून अधिक विम्याची रक्कम दिली जाईल. यासाठी स्वतंत्र विधी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. जखमींना खासगी रुग्णालयातील उपचाराचा संपूर्ण खर्चही कंपनीतर्फे केला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
कंपनी व्यवस्थापन हे या दुर्घटनेच्या अनुषंगाने पोलीस, महसूल आणि उद्योग विभागाशी संपर्कात असून दुर्घटनेसंदर्भात सुरू झालेल्या तपासाचा भाग म्हणून विविध विभागांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे पुरविण्यात येत आहेत. तपास कार्यात प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. या दुर्घटनेत कंपनीचे १५ ते १७ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून आपत्ती प्रसंगाला धावून आलेल्या प्रत्येक समाज घटकांप्रती आदर व ऋण व्यक्त करण्यात आले आहे.
या कंपनीतील प्रत्येक उत्पादन शासनाची परवानगी, नियम, निकष व प्रमाणित मानके यांच्या अधीन राहूनच घेतले जात होते असा दावा करत कंपनीने उत्पादनासंदर्भात कोणताही गैरसमज करून घेऊ नये. कंपनीचा कारभार पूर्णतः पारदर्शक असल्याचाही दावा यावेळी करण्यात आला आहे.