81 खेळाडूंसह 115 जणांचा चमू
भारताला किमान वीस पदकांची अपेक्षा
मुंबई: दिवसेंदिवस भारतीय शरीरसौष्ठवाची (bodybuilders) ताकद वाढतच चाललीय. येत्या 15 ते 21 जुलैदरम्यान मालदीव येथे होणाऱ्या 54 व्या आशियाई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत (Asian bodybuilding competition) तीच ताकद दाखविण्यासाठी 81 खेळाडूंसह 115 जणांचा चमू सज्ज झालाय. या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ म्हणून भारतीय संघाची गणना होत असून भारत किमान वीस पदके जिंकेल, असा दृढ विश्वास भारतीय शरीरसौष्ठव संघाच्या (IBBF) सरचिटणीस हिरल शेठ यांनी बोलून दाखविला.
या स्पर्धेला मालदीवच्या (Maldives) पर्यटन आणि क्रीडा खात्याचे बळ लाभले असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मालदीव ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली आहे.
भारतीय शरीरसौष्ठवाचे ग्लॅमर आगामी आशियाई स्पर्धेत सोनेरी यश संपादण्यासाठी गेले तीन महिने घाम गाळतेय. या स्पर्धेत यतिंदर सिंग, अनुज तालियान, आशिष मान, हरीबाबू आणि महेंद्र चव्हाणसारखे एकापेक्षा एक असे दिग्गज शरीरसौष्ठवाच्या विविध गटात उतरणार आहेत. हा खेळ पुरूषप्रधान असला तरी या खेळात यंदा भारताच्या महिलांचीही ताकद दिसेल.
भारतीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 20 पेक्षा अधिक महिला खेळाडू उतरत असल्याची माहिती शेठ यांनी दिली. यात प्रामुख्याने निशरीन पारीख, मंजिरी भावसार, आदिती बंब, भाविका प्रधान, कल्पना छेत्री, गीता सैनी, अंकिता गेन यांचा समावेश आहे. भारताच्या जम्बो पथकाला खुद्द भारतीय शरीरसौष्ठवाचे आदर्श असलेले प्रेमचंद डेगरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अध्यक्ष टी. व्ही. पॉली, प्रशिक्षक आरसू आणि व्यवस्थापक विश्वास राव हेसुद्धा असतील.
गतवर्षी ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या मि. वर्ल्ड स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त यश संपादताना 22 पदकांची कमाई केली होती. त्यामुळे मालदीवमध्ये भारतीय संघ त्याच यशाची पुनरावृत्ती नव्हे तर आजवरची सर्वोत्तम कामगिरी करीत पदकांचा पाऊस पाडेल, असा विश्वास आयबीबीएफच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी बोलून दाखविला.
एक जागतिक दर्जाची संस्मरणीय स्पर्धा – चेतन पाठारे
मालदीव सरकारचे पूर्ण सहकार्य असलेली ही स्पर्धा निश्चितपणे संस्मरणीय आणि जागतिक दर्जाची होईल, असा आत्मविश्वास जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केला. स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी मालदीव शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा इब्राहिम हमीद यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे मालदिवला एक अप्रतिम आयोजन असलेली जागतिक स्पर्धा होईल, असे पाठारे यांनी आवर्जून सांगितले.
एवढेच नव्हे तर या स्पर्धेसाठी आशियातील 22 देशांचे 500 पेक्षा अधिक दिग्गज खेळाडू सहभागी होत असल्यामुळे जेतेपदासाठी अटीतटीची झुंज निश्चितच पाहायला मिळेल, असाही विश्वास पाठारे यांनी व्यक्त केला.