Twitter : @maharashtracity
मुंबई
एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ आज दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक विचारवंत अशोक वाजपेयी उपस्थित होते. संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत आहे, अशावेळी साहित्याने निर्भय होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अशोक वाजपेयी यांनी केले. दुसरे प्रमुख पाहूणे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी, आज साक्षर आणि निरक्षर यांच्या दरम्यान वाचता येतंय, पण वाचत नाही, असा नवा वर्ग निर्माण झालाय, याबद्दल चिंता व्यक्त केली. युवकांनी अधिकाधिक वाचावे आणि नवे पांडुरंग सांगविकर लेखनातून निर्माण करावे, असे आवाहन नेमाडे यांनी केले.
मुंबईचे केंद्रस्थान अशा दादरमधील आजची सायंकाळ ही साहित्यचर्चेने रसरसलेली ठरली. उभे राहाण्यासही जागा नाही, अशा खच्चून भरलेल्या सभागृहात साहित्य रसिक आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या सर्व वयोगटातील साहित्य रसिकांची उपस्थिती होती.
अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी रानकवी ना. धो. महानोर यांचे स्मरण करून भाषण सुरू केले. आपले राजकीय गुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख त्यांनी भाषणातून केला. पवार म्हणाले, चव्हाण साहित्यप्रेमी होते. त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांच्या खासगी २८ हजार ग्रंथसंपदेचे ग्रंथालयात रूपांतर केले, आज त्याचा लाभ ग्रामीण भागातील युवावर्ग घेत आहे. प्रत्येकाने वाचून झालेली पुस्तके ग्रंथालयात द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. सध्या बंद असलेली शारदा चित्रपटगृहाची इमारत दुरुस्ती व सुधारणा करून त्यातून उपलब्ध रकमेतून हे ग्रंथालय अधिक सुसज्ज करु, असेही पवार म्हणाले.
अशोक वाजपेयी म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात आज राजनीतिची काळी छाया पडत आहे. दुनिया वस्तूंनी बदलते, विचाराने नाही हे ठसविले जाते आहे. साहित्याने याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे. हमारे शोकगीत का यह अंतिम चरण है, या आपल्या काव्यपंक्तींनी वाजपेयी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
डॉ. भालचंद्र नेमाडे यावेळी म्हणाले, ग्रंथालये ही महासागरातील बेटे असतात. आत्मविश्वास हा वाचनातून येतो. ही संस्था अशीच आहे. या संस्थेत विद्यार्थी दशेत अभ्यास केला आहे. जगातील साऱ्या क्रांती या साहित्य वाचनातून घडल्या. या देशात प्राचीन काळी तक्षशिला ते चोल साम्राज्यपर्यंत २५ विद्यापीठे होती. आज कशाचा अभिमान बाळगायचा, एक लाख महिलांवर अत्याचार होतात याचा? असा सवालही नेमाडे यांनी केला. पुस्तकातूनच जग कळेल असेही ते म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रगीताने या शानदार सोहळ्याची सांगता झाली.