जुलै ते सप्टेंबर दरम्यान विक्रीत २२ टक्क्यांची आणि नवीन पुरवठ्यामध्ये १७ टक्क्यांची वाढ
मुंबई
भारतातील आघाडीच्या आठ निवासी बाजारपेठांनी कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान (जुलै ते सप्टेंबर 2023) विक्रीमध्ये 22 टक्के आणि नवीन पुरवठ्यामध्ये 17 टक्क्यांची वाढ केल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. चेन्नई वगळता सर्व शहरांनी विक्रीत वाढीची नोंद केली, जेथे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) आणि पुणे यांचे एकूण आकारमानामध्ये जवळपास निम्मे योगदान होते.
आरईए इंडियाची मालकीहक्क असलेली आणि हाऊसिंग डॉटकॉम व मकान डॉटकॉमची मूळ कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम या आघाडीच्या डिजिटल रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने आपला अहवाल ‘रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्टेंबर 2023’ जारी केला. या अहवालामधून निदर्शनास येते की, निवासी सदनिकांची विक्री तिसऱ्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील 83,220 युनिट्सवरून 1,01,220 युनिट्सपर्यंत वाढली आहे.
प्रॉपटायगर डॉटकॉमच्या त्रैमासिक अहवालात दिल्ली-एनसीआर, एमएमआर, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या आठ प्रमुख गृहनिर्माण बाजारपेठांचा मागोवा घेण्यात आला आहे.
आरईए इंडियाचे सीएफओ आणि प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख श्री. विकास वाधवान म्हणाले, “अव्वल आठ शहरांमधील गृहनिर्माण बाजारपेठांनी विकासाची गती कायम ठेवली आहे. प्रबळ मागणीचे श्रेय सकारात्मक ग्राहक भावनेला जाते. श्री. वाधवान यांनी विक्रीमधील वाढीचे प्रमुख स्रोत म्हणून वाढती मागणी, वाढते डिस्पोजेबल उत्पन्न, स्थिर व्याजदर आणि नवीन गुंतवणूकदार मागणी यांसारख्या घटकांना निदर्शनास आणले.”
प्रॉपटायगर डॉटकॉम डेटामधून निदर्शनास येते की, अहमदाबादमधील वार्षिक गृहनिर्माण विक्रीत 31 टक्क्यांच्या वाढीसह 7,880 युनिट्सवरून 10,300 युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. बंगळुरूमधील विक्रीत 60 टक्क्यांच्या अधिकतम वाढीसह 7,890 युनिट्सवरून 12,590 युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. दिल्ली-एनसीआरने विक्रीमध्ये 5,430 युनिट्सवरून 7,800 युनिट्सपर्यंत 44 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. हैदराबादमधील विक्रीत 10,570 युनिट्सवरून 14,990 युनिट्सपर्यंत 34 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोलकातामधील विक्रीत 43 टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, ज्यामुळे सदनिकांच्या विक्रीत 2530 युनिट्सवरून 3,610 युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विक्रीत 28,800 युनिट्सवरून 30,300 युनिट्सपर्यंत फक्त 5 टक्क्यांची वाढ झाली आहे, ज्यासाठी उच्च मूल्य कारणीभूत आहे. पुण्यातील विक्रीत 15,700 युनिट्सवरून 18,560 युनिट्सपर्यंत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. चेन्नई ही एकमेव बाजारपेठ आहे, जेथे विक्रीत 12 टक्क्यांची घट झाली आहे, ज्यामुळे सदनिकांच्या विक्रीत 4,420 युनिट्सवरून 3,870 युनिट्सपर्यंत घट झाली.