@maharashtracity
साहित्यिक लक्ष्मणराव शिरभाते यांचा मानस
नवी दिल्ली: हिंदी भाषेतील श्रेष्ठ साहित्यिक गुलशन नंदा (Novelist Gulshan Nanda) यांच्या साहित्याने प्रेरित होवून ३५ पुस्तकांचे लेखक म्हणून लौकिक मिळाला. हा प्रवास थांबला नसून जगप्रसिध्द लेखक शेक्सपियर (Shakespeare) प्रमाणे उच्च दर्जाचे लेखन करण्याचा मानस महाराष्ट्राचे सुपुत्र व वरिष्ठ हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव शिरभाते यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आयटीओ (ITO Delhi) परिसरातील विष्णू दिगंबर मार्गवर चहाची टपरी चालवत लेखन-प्रकाशन व्यवसाय सांभाळणाऱ्या लक्ष्मणराव यांच्या कार्याची दखल घेवून येथील एका प्रसिध्द पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना चहाचे काउंटर आणि लेखन स्टॉल उपलब्ध करून दिला आहे.
या उपलब्धीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने (MIC) लक्ष्मणराव यांचा सत्कार व अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी लक्ष्मणराव यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार, सामाजिक कार्यकर्त्या कविता नारायणन यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी लक्ष्मणराव यांच्यासोबत कार्यालयातील अधिकारी– कर्मचारी यांचा औनपचारिक वार्तालाप झाला. हिंदी भाषेतील लेखक बनण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या श्री लक्ष्मणराव यांचा अमरावती (Amravati) जिल्हयातील तळेगाव (दशासर) या त्यांच्या मूळ गावाहून दिल्लीतील प्रवेश आणि उदरनिर्वाह व ध्येय प्राप्तीचा पटच श्री लक्ष्मणराव यांनी यावेळी उलगडला.
त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी ‘रामदास’ ही हिंदी कांदबरी लिहिली व ती प्रकाशित करायची म्हणून १९७५ मध्ये थेट दिल्लीत आले. याच शहरात राहून हिंदी लिखाण करण्याचा चंग बांधून त्यांनी मोठया प्रमाणात वाचन केले. दिल्ली विद्यापीठातून (Delhi University – DU) पदवी व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून (IGNOU) त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
लेखन कार्यही सुरुच होते. पण, कोणी प्रकाशक त्यांचे पुस्तक प्रकाशित करत नव्हते. अशात त्यांनी उदरनिर्वाह व परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी आयटीओ परिसरातील विष्णू दिगंबर मार्गवर चहाची टपरी सुरु केली व स्वत:च पुस्तक प्रकाशित करून येथेच ते पुस्तक विक्रीही करू लागले.
आजवर त्यांनी कादंबरी, कथा, वैचारिक या साहित्य प्रकारात ३५ पुस्तके लिहिली असून त्यातील २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘रामदास’, ‘नर्मदा’, ‘रेणु’ आदी त्यांच्या कादंबऱ्या तर ‘अहंकार’, ‘दृष्टिकोण’, ‘अभिव्यक्ति’ आदी त्यांचे कथासंग्रह प्रसिध्द आहेत. ‘द बॅरिस्टर’ हे महात्मा गांधीजींवरील (Mahatma Gandhi) व ‘प्रधानमंत्री’ हे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्यावरील पुस्तकांसह त्यांचे वैचारीक पुस्तके प्रकाशित आहेत.
लक्ष्मणराव यांच्या कार्याची दखल द न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन सारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांनी घेतली आहे. त्यांच्या कार्याची महती ऐकूण येथील अशोक रोडस्थित ‘ला शंग्रीला’ या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाने लक्ष्मणराव यांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांचा चहाचा काउंटर उघडला आहे.
त्यांची पुस्तकेही या काउंटरवर विक्रीसाठी उपलब्ध असून येथे येणारे पाहुणे लक्ष्मणराव यांच्यासोबत गप्पा मारत चहाचा आनंद घेतात. या हॉटेलकडून चांगला पगारही मिळतो. वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आपले लेखन पोहचते याचा आनंद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आर्थिक लाभ मिळविणे लेखकाचे ध्येय नसावे. तसेच प्रतिद्वंद आणि प्रतिस्पर्धेपासून लेखकांनी लांब रहावे. तसेच सर्वप्रकारचे वाचन करावे, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
भविष्यात जागतिक किर्तीचे लेखक शेक्सपीयर प्रमाणे लेखन करण्याचा तसेच आपल्या लिखित साहित्याचा मराठी, पंजांबी आणि उर्दु भाषेत अनुवाद होवून जास्तीत-जास्त वाचकांपर्यंत हे साहित्य पोहचावे, असा मानसही लक्ष्मणराव यांनी बोलून दाखवला.
अमरज्योत कौर अरोरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर अंजू निमसरकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले.
परिचय केंद्राच्या ग्रंथालयास पुस्तके भेट
श्री लक्ष्मणराव यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयास त्यांची सर्व प्रकाशित पुस्तके भेट स्वरुपात दिली.