Twitter : @maharashtracity
मुंबई
भारताचा प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन, या दिवशी देशप्रेमाला भरती येते. मात्र हे देशप्रेम फक्त तिरंगा झेंडा फडकवणे किंवा शर्टाला तिरंगा लावणे, देशभक्तीपर गाणे म्हणणे एवढ्याच पुरता मर्यादित राहते. किती तरुणांना राष्ट्रगीत किंवा आपली प्रतिज्ञा म्हणता येते, हा संशोधनाचा विषय असला तरी याच मुद्द्याला घेऊन दोन पोलीस पुत्रांनी एक अभिनव कल्पना मांडली आहे. राष्ट्रगीत म्हणा किंवा प्रतिज्ञा बोलून दाखवा आणि जेवणावर पन्नास टक्के सूट मिळवा, अशी ही ऑफर 18 वर्षे पूर्ण केलेल्या सगळ्यांसाठीच जाहीर केली आहे.
सगळ्याच पोलिसांचे पुत्र काही पोलीस होत नाही, अनेक मुले वेगळे वेगळा मार्ग निवडतात. काही उच्चशिक्षित होऊन नोकरी करतात तर काही व्यवसायात येतात. वरळी पोलीस वसाहतीमधील अमित सावंत आणि इग्नार्थी ब्राम्हणे या दोन पोलीस पुत्रांनी व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. वरळीतील पोतदार हॉस्पिटल समोर शासकीय विश्रामगृह येथे ‘विसावा -गावरान तडका’ नावाचे हॉटेल वीस दिवसापूर्वी सुरू केले.
यासंदर्भात maharashtra.city शी बोलताना अमित सावंत यांनी सांगितले की भावाच्या मदतीने त्याने हे एक हॉटेल सुरू केले. सुमारे साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. आपल्या हॉटेलला पोलीस वसाहतीतील सगळ्यात लोकांनी भरभरून पाठिंबा दिला, त्यामुळे आपला व्यवसाय उत्तम सुरू आहे, असे त्याने सांगितले.
ग्राहक केवळ हॉटेलमध्येच येऊन जेवत नाहीत तर पोलीस वसाहतीत आणि अन्य ठिकाणी टिफिन सेवा देखील सुरू केली आहे, असे अमित सावंत याने अभिमानाने सांगितले. अमित पुढे म्हणाला, आमचा एक हितचिंतक आहे, त्याचे नाव वैभव परब आणि तो आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. अमित म्हणाला उद्या 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली. त्यामुळे उद्याच्या दिवशी ग्राहकांना काही टक्के सूट द्यावी, असा विचार माझ्या मनात होता. मात्र, वैभव परब याने माझ्या या संकल्पनेला अतिशय स्तुत्य अशी जोड दिली.
भारताच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या हॉटेलमध्ये जेवायला येणारी 18 वर्षावरील जी व्यक्ती राष्ट्रगीत गाऊन दाखवेल किंवा प्रतिज्ञा म्हणून दाखवेल, त्याला जेवणामध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. संकल्पनेमागे आमचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आजच्या तरुणाईला देशभक्तीचे वेड लागावे.
आज समाजामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टीवरून विनाकारण वाद होत आहेत, समाजामध्ये दुहीचे बीज पेरले जात आहे, यावेळी आपल्या मनामध्ये किमान एक दिवस तरी देशभक्तीचे स्फुल्लिंग जागरूक व्हावे, हाच आमचा उद्देश आहे. जनतेनेही आमच्या या ‘गावरान तडका’ला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि त्याचवेळी राष्ट्रगीत किंवा प्रतिज्ञा म्हणून आपल्यातील देशभक्तीला तडका द्यावा, असे आवाहन अमित सावंत याने केले आहे.