@maharashtracity

१५ जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात शून्य मृत्यू नोंद

मुंबई: डेल्टा वेरियंटचा पहिला रुग्ण आढळलेल्या राज्यातील जिल्हा आणि या जिल्ह्यांच्या आजूबाजूच्या अशा एकूण १५ जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत शून्य मृत्यूची नोंद झाली असल्याची कोविड आकडेवारी सांगत आहे.

लसीकरणाची (vaccination) अंमलबजावणी आणि निर्माण झालेली हर्ड इम्युनिटी (herd immunity) मृत्यू कमी होण्यास कारणीभूत असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत.

दरम्यान, राज्यात एकही मृत्यू नसलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, नागपूर, नांदेड, नंदुरबार, पालघर, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे येत आहेत. यात अमरावती जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण समोर आला. मात्र यावर अद्याप अभ्यास सुरु आहे.

अमरावतीसह अकोला, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या नऊ जिल्ह्यांना डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) सर्वाधिक संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चंद्रपूर आणि वर्धा येथे प्रत्येकी दोन आणि एक मृत्यूची नोंद झाली आहे.

Also Read: दिव्याखाली अंधार; पालिका मुख्यालयासमोर खड्डा

धुळे, नंदुरबार आणि जळगाव यासह उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि मराठवाड्यातील दोन, हिंगोली आणि नांदेडमध्येही एकाही कोविड मृत्यूची नोंद झालेली नाही. तर, कोकण प्रदेशातील पालघर या जिल्ह्यात महिनाभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

धुळे आणि भंडारा येथे अनुक्रमे एप्रिल आणि जूनपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नसून नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात ९० दिवसांपासून एकही कोविड मृत्यू नोंद झाली नाही. या महिन्यात मृतांच्या संख्येत घट झाली असून आतापर्यंतची ही सर्वात कमी नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकवस्ती विरळ असून लोकसंख्या कमी असल्याचा या जिल्ह्यांना फायदा झाला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्यातील गेल्या दोन महिन्यातील मृत्यूची आकडेवारी पहिल्यास सप्टेंबर महिन्यात १,६४५ मृत्यू तर ऑक्टोबर महिन्यात १,०१३ मृत्यू नोंदविण्यात आले. तसेच नोव्हेंबर महिन्यात ५९१ मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, १६ नोव्हेंबरपर्यंतच्या राज्य विश्लेषणात बहुतांश मृत्यू सहा जिल्ह्यांमध्ये नोंदविण्यात आले. मुंबईत -४९, अहमदनगर -४६, सातारा -२५, पुणे-२३, रायगड -१४ आणि ठाणे -१४ हे ते सहा जिल्हे असून इतर १४ जिल्ह्यांमध्ये एक अंकी मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

यावर बोलताना राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे (Dr Subhash Salunkhe) यांनी सांगितले की, मृत्यूची नोंद शून्य होणे सकारात्मक बाब असली तरीही कोविड वर्तणूक पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here