@maharashtracity

मुंबई: राज्यातील पोलिस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे (Deputy Chairperson of Legislative Council Dr Neelam Gorhe) यांनी दिले

विधानभवनात महिलांविषयक विविध प्रश्नांवर दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक पार पडली. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन सिन्हा, अकोला, बीड, नगर, सोलापुर, रायगड, अमरावती , चंद्रपुर व संबधित जिल्हयांचे पोलिस अधिक्षक दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात.

महिला दक्षता समित्यांसाठी कार्यपद्धती निश्चित करावी व मार्गदर्शक पुस्तिका तयार करावी. बालविवाह, पोटगी, सोशल मिडीयामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामगार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तत्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणा-या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत. वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गो-हे यांनी केल्या.

विशाखा समितीची स्थापना: कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत विशाखा मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात आहेत.त्याप्रमाणे विशाखा समित्या स्थापन करून तक्रारींचा आढावा घ्यावा.

*कोरोनाच्या काळात दाखल झालेल्या एफआयआर तपासात अडथळे किंवा तो तपास पूर्ण न झालेल्या ‘बी समरी’ रिपोर्ट झालेल्या केसेसच पुनरावलोकन करून सदरील केसेसचा आढावा घ्यावा व आवश्यकता असल्यास त्यात पुन्हा तपास करावी, अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली. याबाबत उचित कार्यवाही करून तपशील सादर करण्याची निर्देश ना.देसाई यांनी पोलीस प्रशासन दिले.

महिलांविषयक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी – राज्यमंत्री शंभूराज देसाई

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्हयात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियंमानुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी. सातारा जिल्हयात फक्त पत्राव्दारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

यावेळी पोलीस ठाणेनिहाय महिलांच्या दक्षता समित्यांची पुनर्रचना करणे, ग्रामीण भागातील कोविड सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा, कोविडमुळे अनाथ झालेली बालके, महिला अत्याचार घटनांची घेण्यात येणारी तात्काळ दखल, महिलांसाठी सुरक्षेच्या योजना, प्रत्येक जिल्हयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पोलिस विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here