@maharashtracity

पालिकेकडून दुर्लक्ष झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

प्रयत्नांची शिकस्त केल्याचे पालिकेकडून स्पष्टीकरण

मुंबई: मुंबई महापालिकेच्या प्रसतिगृहात दाखल झालेल्या एका महिलेचा २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास दुर्लक्षामुळे मृत्यू ओढविला असल्याचा गंभीर आरोप मुलुंडमधील भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. (BJP MLA Mihir Kotecha held BMC hospital responsible for death of pregnant woman)

याप्रकरणी संबंधित दोषीं पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोटेचा यांनी पत्राद्वारे केली आहे.

मात्र, तिच्यावर यथोचित उपचार सुरु असताना तिची प्रकृती अधिक खालावली. डॉक्टर उपस्थित असतानाच त्या महिला रुग्णाला नायर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला असता त्यावेळी एकही नातेवाईक उपस्थित नव्हते. याचदरम्यान महिलेची प्रकृती खालावत मृत्यू झाला असल्याचे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले.

मुलुंडमध्ये पालिकेच्या टी विभाग प्रसतिगृहात त्या महिलेला दिनांक २७ सप्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, या प्रसतिगृहात २४ तास डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार रहिवाशांनी वारंवार करुनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही कोटेचा यांनी पत्रात नमूद केले आहे.

या प्रसूतिगृहात २४ तास डॉक्टर उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, तिथे अर्धा दिवसच डॉक्टर असतात, अशी तक्रार वारंवार करण्यात आली आहे.

त्यानंतर महिलेची प्रकृती रात्री बिघडली. मात्र तेव्हा तिथे कोणतेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना मुलुंड पूर्वेतील स्वातंत्रवीर सावरकर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. परंतु, या ठिकाणीही डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कोटेचा यांनी केला आहे.

यावर पालिकेने दिलेल्या खुलाशात सांगितले की, ७ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला २६ सप्टेंबर रोजी पालिकेच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याआधी महिलेला दोन दिवसांपासून ताप होता. त्यानुसार तपासणी केल्यानंतर त्या महिलेला रक्त तपासणी करण्याचा आणि लक्षणे आधारित उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला.

त्या महिलेचे रक्तनमुने देखील वैद्यकीय चाचण्यांसाठी पाठविण्यात आले. मात्र, प्रसुतीगृहात दाखल झाल्यानंतर त्या महिलेचा ताप कमी झाला व तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी त्या महिलेस जुलाबाचा त्रास झाला.

यानंतर यथोचित उपचार दिल्यावर महिलेची प्रकृती स्थिर झाली होती. दरम्यान, रात्री बारा वाजेच्या सुमारास त्या महिलेस पुन्हा एकदा जुलाबाचा त्रास होण्यासह चक्कर आली होती.
त्यानुसार त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी त्या महिलेला पालिकेच्याच स्वातंत्र्यवीर सावरकर रूग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.

महिला रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ न शकल्याने याबाबत स्थानिक पोलिसांना नातेवाईक उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर त्या महिला रुग्णास स्वातंत्र्यवीर सावरकर रूग्णालयात हलविण्यात आले.

महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला नायर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी देखील नातेवाईक उपस्थित नव्हते. तिचे नातेवाईक येईस्तोवर रुग्णाची तब्येत आणखी खालावली. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरू केले.

मात्र, रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर मध्यरात्री ३:२२ वाजता त्या महिलेस मृत घोषित करण्यात आले.

या रुग्ण महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here