@maharashtracity

धुळे: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नारपार प्रकल्पातून (Nar -Par irrigation project)खान्देशला हक्काचे ७० टक्के पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी गोदावरी खोर्‍यात (Godavari Basin) वळवण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे खान्देशवर अन्याय होईल. सरकारला खान्देशाचे वाटवंट करायचे आहे का? असा प्रश्न येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या चिंतन बैठकीत उपस्थित झाला.

याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी चार टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. खान्देशातील सिंचनाचा (Irrigation projects in Khandesh){प्रश्न सोडविण्यासाठी नदीजोड प्रकल्प होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे मत उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

विकास पाटील यांनी सांगितले की, खान्देशाचे हक्काचे पाणी अन्यत्र वळविले जात आहे. याविषयी आमदार, खासदारांना निवेदन दिले. पण काहीही झाले नाही. लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्यावर ते लक्ष देतील का?

खान्देशाच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पहिल्या टप्प्यात नंदुरबार ते सुरगाणा जलयात्रा काढण्यात येईल. दुसर्‍या टप्प्यात तालुका, जिल्हास्तरावर धरणे तर तिसर्‍या टप्प्यात गावबंद आंदोलन तर चौथ्या टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
खान्देशातील विविध प्रकल्पांची पुर्तता करण्यासह नारपार प्रकल्पातून हक्काचे ७० टक्के पाणी मिळविण्यासाठी अनेक संघटनांनी एकजुट करून उत्तर महाराष्ट्र जलपरिषद गठीत केली आहे. पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी अनेक निवेदन देण्यात आली. पण उपयोग झाला नाही. राजकीय इच्छाशक्ती अभावी कामे होत नाही, असेही पाटील म्हणाले.

शासन, प्रशासनाच्या उदासिन कारभारामुळे नदीजोड प्रकल्प (River Linking project) प्रलंबित आहे. मुख्यमंत्री पदाबाबत खान्देशावर अन्याय झाला. तसेच एकही मोठा नेता नसल्याने खान्देशचे कोणी ऐकत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत बापू हाटकर यांनी मांडले. 

वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्रा.के.एम.अहिरे म्हणाले की, पाडळसे प्रकल्पासाठी ३ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र आतापर्यंत केवळ १४० कोटींचा निधी मिळाल्याने काम थांबले आहे.
या वेळी शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे, माजी नगराध्यक्ष तथा पाडळसे धरण जनआंदोलनाचे प्रमुख सुभाष चौधरी, नरेंद्र पाटील, प्रा. एच. एम. पाटील, ए.जी. पाटील, रणजित शिंदे, ऍड. निकम, प्रा. सुनील पाटील, दीपक पाटील, गोरख माळी, हरचंद चौधरी, लीलाधर सोनर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here