Twitter: @vivekbhavsar

मुंबई: राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे सरकारमध्ये नगर विकास मंत्री असताना या खात्यासह मुंबई महागर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) अणि मुंबई महापालिकेत (BMC) सत्ताबाह्य शक्ती म्हणून वावरणारे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक अजय आशर (Ajay Ashar) यांची आज शिंदे यांनी “मित्र” च्या उपाध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे “नगर विकास खाते चालवते कोण – मंत्री शिंदे की आशर?” या मथळ्याखाली maharashtra.city ने २६ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीचे उत्तर आज दोन वर्षांनी मिळाले आहे.

महाराष्ट्र सरकारने “मित्र” अर्थात महाराष्ट्र इन्स्टीट्यूशन फॉर ट्रान्सफोर्मेशन (Maharashtra Institution for Transformation) या संस्थेची नुकतीच स्थापना केली. सन २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार (Modi government) सत्तेत येताच तोपर्यंत अस्तित्वात असलेली केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करून निती आयोग (NITI Ayog) स्थापन करण्यात आला होता. केंद्रीय योजनांचा आढावा घेणे अणि नव्याने धोरण तयार करून त्याची शिफारस केंद्राला करणे असे काम निती आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. 

त्याच धर्तीवर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने “मित्र” ची स्थापना केली आहे. निती आयोगावर मोदी सरकारने अमिताभ राजन  यांच्यासारखे तज्ञ नियुक्त केले होते. शिंदे – फडणवीस सरकारने मात्र अजय आशर या तद्दन बांधकाम व्यावसायिकाची अणि माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) या दोघांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. 

नगरविकास मंत्रालय कोण चालवतंय – मंत्री शिंदे की आशर?

या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्याची तिजोरी अजय आशर यांच्याकडे सोपवण्यात आहे का असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे. याच आशर यांच्या नगर विकास विभागातील (Urban Development department -UDD) हस्तक्षेपावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अणि आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेप घेतला होता, याकडे नाना पटोले यांनी आज लक्ष वेधले आहे.

Also Read: UD Minister Eknath Shinde’s puppet “Ashar’ is on the radar of LoP Devendra Fadnavis

राजेश क्षीरसागर हे २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्याने तत्कालीन ठाकरे सरकारने त्यांना राज्य नियोजन मंडळाच्या (State Planning Board) उपाध्यक्षपदी नियुक्ती करून राजकीय सोय केली होती. हेच क्षीरसागर शिंदे गटात सहभागी झाल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची नियुक्ती “मित्र” च्या उपाध्यक्षपदी करून पुन्हा एकदा राजकीय सोय केली आहे.

क्षीरसागर माजी आमदार असल्याने त्यांच्या नियुक्तीला कोणीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र, बांधकाम व्यावसायिक अजय आशर यांना मित्र सारख्या राज्याचे धोरण ठरवणाऱ्या अणि वेगवेगळ्या विषयावर सल्ला देणाऱ्या संस्थेवर घेतल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत.

Maharashtra.city ने डिसेंबर २०२० मध्येच आशर यांचा सत्ताबाह्य हस्तक्षेप उघडकीस आणला होता. नगर विकास विभागाने काय धोरण आखावे याचा निर्णय आशर यांच्या खाजगी कार्यालयातून घेतला जात असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून केल्या जात होत्या. एम एम आर डी ए च्या शासकीय बैठकीला अनधिकृतरित्या उपस्थित राहणाऱ्या अजय आशर यांच्याबद्दल बैठकीतच आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) त्याकडे दुर्लक्ष केले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने maharashtra.cityत्यावेळी दिली होती.

आता तर अधिकृतरित्या “मित्र” वर नियुक्ती केल्याने आता सर्वच अधिकाऱ्यांना आशर यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहावे लागेल अणि सर्व कागदपत्रे “मित्र” कडे सादर करावे लागणार आहेत,  अशी प्रतिक्रिया अन्य एका अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, आशर यांच्या नियुक्ती आदेशात त्यांना  बांधकाम क्षेत्र, सामाजिक कार्य, नागरी अणि वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असल्याचे नमूद केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील (CMO) तीन सत्ता केंद्रापैकी (power Centre) एका केंद्राला अधिकृत दर्जा मिळाला असल्याची प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here