गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना

@maharashtracity

महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडावर (Raigad Fort) असलेला पाण्याचा स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणी टंचाईचे (water scarcity) सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील कामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पुरातत्व विभागाला लेखी पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

प्रतिवर्षी छ.शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा केला जातो. याकरिता रायगडावर जय्यत तयारी केली जाते. गेले दोन वर्ष हा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली corona pandemic) साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र, यावर्षी निर्बंध शिथिल केल्याने श्री शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा होण्याची शक्यता आहे.

गडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांना यावेळी पिण्याच्या पाण्याची सुविधा गंगासागर (Gangasagar lake) आणि कोलिम तलावामधून केली जाते. यावर्षी तापमानात झालेली कमालीची वाढ यामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई डोके वर काढत आहे. गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतदेखील आटत चालले आहेत. त्यातच गडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु आहेत. या कामांना देखील याच तलावातून पाणी उपसा केला जात आहे.

जून महिन्यात येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला देखील याच तलावातील पाणी वापरले जात असल्याने ऐन टंचाई काळात गडावरील कामांना गंगासागरमधील पाण्याचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या (ZP) पाणीपुरवठा विभागाने पुरातत्व विभागाला केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र दिनांक २९/०४/२०२२ रोजी देण्यात आले आहे.

किल्ले रायगडावर गंगासागर, हत्ती तलाव, बारा टाके, कोलिम तलाव, हनुमान टाके इत्यादी पाणी स्त्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलिम तलावमधील पाणी पिण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. मात्र, या तलावातील पाण्याची पातळी ऐन मे महिन्यात कमी होते. शिवाय शिवजयंती, शिवपुण्यतिथी, यानिमित्ताने गडावर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची गर्दी असते. अशा वेळी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो.

हत्ती तलावाची गळती काढल्याचा दावा सध्या सुरु असलेल्या कामावरील यंत्रणेने केला होता. मात्र, सध्या हत्ती तलावात पाणी उरलेले नाही. गडावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र ही नळपाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्याने आणि रायगड प्राधिकरणच्या कामात नव्याने समाविष्ट झाल्याने नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे अन्य ठिकाणचे पाणी गंगासागरमध्ये आणणे किंवा इतर ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे गडावर सुरु असलेल्या कामांवर गंगासागरमधून पाण्याचा होत असलेला अमर्याद उपसा थांबवण्याच्या सूचना पुरातत्व विभागाला करण्यात आले आहेत.

पुरातत्व विभागाला याची माहितीच नाही

किल्ले रायगड ज्यांच्या ताब्यात आहे त्या पुरातत्व विभागाचे केअर टेकर राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र आपल्याकडे आलेले नाही असे सांगून याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. रायगडावर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता एक जबाबदार अधिकारी म्हणून पुरातत्व विभागाचे लक्ष असणे गरजेचे आहे. शिवभक्तांच्या सोयीसुविधांकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे पुरातत्व विभागाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here