सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये स्थूलता वाढतेयं
तीन शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यात १९ जून ते २६ जून या कालावधीत राज्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तपासण्यात आले. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांच्या जवळील तीन शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वजन, उंचीच्या आधारे बॉडी मास्क इंडेक्स, मधुमेह आणि रक्तदाब तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जेजे हॉस्पिटलच्या माध्यमातून माझगावचे जीएसटी भवन, डोंगरीचे बालसुधारगृह आणि नागपाडा येथील अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तीन कार्यालयांमध्ये १९० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ५१ टक्के कर्मचाऱ्यांचे वजन जास्त असल्याचे आढळले.
दरम्यान, राज्यात विविध घटकांची आरोग्य तपासणी सुरु असून यातून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या स्थूलपणाच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणी केलेल्या कर्मचाऱ्यांना डॉक्टरांनी लठ्ठपणा टाळण्यासाठी टिप्सही दिल्या असून पुढील तपासणीसाठी त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. राज्यातील नागरिकांमध्ये वाढत्या लठ्ठपणाची समस्या लक्षात घेऊन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने लठ्ठपणा-जनजागृती आणि उपचार हे अभियान सुरू केले आहे.
जेजे रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, या १९० कर्मचाऱ्यापैकी ५१ टक्के म्हणजेच ९७ कर्मचाऱ्यांचे वजन जास्त आहे. याशिवाय २७ कर्मचारी उच्च रक्तदाबाने तर १८ कर्मचारी मधुमेहाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच ५० कर्मचारी मधुमेहाच्या विळख्यात सापडले आहेत. यावर जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी या कर्मचाऱ्यांना लठ्ठपणा टाळण्यासाठी सुचना दिल्या असून यात व्यायाम करणे इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच त्यांना इतर आजारांसाठी रुग्णालयात सुचविण्यात आले आहे.