By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
वर्धा – राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (आचार्य विनोबा भावे सभामंडप)
अनुवाद हा संवादातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आपण हा अनुवाद का करतो आहोत हा प्रश्न स्वतःला विचारून अनुवादकाने पुढे जावे. माझ्यासाठी म्हणाल तर एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद करणे हे माझ्यासाठी जगणं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्य अभ्यासक, अनुवादक डॉ. विनया बापट यांनी आज येथे केले.
येथील ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात ‘भारतीय व जागतिक विश्वात मराठीची ध्वजा फडकविणारे अनुवादक, या परिसंवादाच्या अध्यक्ष म्हणून डॉ. बापट बोलत होत्या. अन्य वक्ते म्हणून डॉ. बळीराम गायकवाड आणि अरुणा जोशी होते.
परिसंवादास प्रारंभ करताना डॉ. गायकवाड म्हणाले, चाळीसपेक्षा जास्त साहित्य प्रकार मराठी भाषेत आहेत. तितके इतर कोणत्याही भाषेत नाहीत. मात्र, गेल्या चाळीस वर्षात पंधरा ते वीस इतकीच पुस्तके इतर भाषांत अनुवादित झाली हे वास्तव आहे. अण्णाभाऊ साठे हयात असतानाच जागतिक भाषांसह सत्तावीस भाषांत त्यांची सत्तावीस पुस्तके अनुवादित झाली होती. अनुवादांमुळे सर्व भाषांमध्ये संवाद शक्य होतो. सर्व भाषा एका धाग्यात गुंफण्याचे सामर्थ्य अनुवादात आहे. सर्व खंडांत मराठी बोलली जाते, त्यामुळे अधिकाधिक मराठी पुस्तकांचे अनुवाद जागतिक भाषांत होत राहावेत, अशी अपेक्षा डॉ गायकवाड यांनी व्यक्त केली.
बडोदे येथील वक्त्या अरुणा जोशी म्हणाल्या, “मराठी साहित्य देशभर अधिकाधिक अभ्यासले जाते. मात्र, हिंदीशिवाय इंग्रजीत त्यांचे मोठ्या प्रमाणावर अनुवाद व्हावे. त्यामुळे ते इतर जागतिक भाषांत जाईल. मराठीतील साहित्य इंग्रजीत नेण्याचे कार्य केलेल्या दिलीप चित्रे यांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. स्वत:च्या कवितांचे केलेच पण समग्र तुकोबा, चित्रेंनी अनुवादित केले. त्यांची पुस्तके पुढे जर्मन भाषेतही अनुवादित झाली.” अन्य अनुवादक म्हणून शांता गोखले, प्रिया आडारकर, सचिन केतकर, अदिती कुलकर्णी यांचाही गौरवपर उल्लेख अरुणा जोशी यांनी केला.
सूत्रसंचालन शलाका जोशी, तर आभार प्रदर्शन, अर्चना धानोरकर यांनी केले.