शिवाजी पार्क आणि बीकेसी दोन्ही मेळाव्यात जादा डेसिबल आवाजाची नोंद
@maharashtracity
मुंबई: मुंबईत दोन दसरा मेळावे हे यंदाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क भरविण्यात आला होता. यंदाच्या दोन्ही मेळाव्याच्या आवाजाची तीव्रता उच्च डेसिबल असल्याची नोंद करण्यात आली. यात सर्वाधिक शिवाजी पार्कवरील किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबल तर बीकेसी येथील धैर्यशील माने यांच्या भाषणावेळी ८८.५ डेसिबल इतक्या डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली असल्याचे आवाज फाऊंडेशन संस्थेकडून सांगण्यात आले. तर शिवाजी पार्कातील ढोल ताशाचा सर्वाधिक म्हणजे १०१.६ डेसिबल इतका नोंदविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजी पार्क येथील मेळाव्यात सायंकाळी ५.३० च्या दरम्यान ६१ ते ६९ डेसिबल इतका आवाज मागच्या कोलाहालाचा होता. त्याच वेळेदरम्यान स्वागताच्या भाषणाचा आवाज ८०.१ डेसिबल इतका नोंदविण्यात आला. तर ५.४० वाजता ढोल ताशांचा ८०.३ ते १०१.६ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. यावेळी रस्त्यावर तसेच शिवाजी पार्कच्या गेटवर हा आवाज नोंदविण्यात आला.
तर शिवसेनेचे गाणे सुरु असताना ८६.५ ते ९१.३ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला होता. तर ६.१५ वाजता किशोरी पेडणेकर यांचे भाषण सुरु असताना ८४.६ ते ९७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. तसेच नितिन देशमुख आणि रस्त्यावर ढोल वाजणे सुरु होते. त्यावेळी ८८.७ ते ९३.५ डेंसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. या आवाजात वक्त्याचे भाषण ऐकायलाच येत नव्हते.
तसेच अंबादास दानवे यांच्या भाषणावेळी ८७.४ ते ९६.६ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. सुभाष देसाई यांच्या भाषणावेळी ८७.९ ते ९३.१ इतका आवाज नोंदविण्यात आला. तर सुषमा अंधारे यांच्या भाषणाच्या वेळी ७७.६ ते ९३.६ इतका अतिउच्च डेसिबल आवाज नोंदविण्यात आला होता.
त्यानंतर भास्कर जाधव सव्वा सातच्या दरम्यान भाषणाला उभे राहिले तेव्हा ७५.४ ते ९२.१ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. तर पावणे आठच्या दरम्यान उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताना ८५.७ ते ८६.८ इतका आवाज असून प्रत्यक्षात उद्धव भाषण करत असताना मात्र ६८.६ ते ८८.४ डेंसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. तर शिवसेनेच्या गाण्याच्या वेळी ८० ते ८६.२ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला.
शिवाजी पार्कवर शाळा आणि नर्सिंग होम असून या ठिकाणी आवाजाची पातळी १०१.६ डेंसिबलची नोंदविण्यात आली. यंदाचा मेळावा सुमारे ३ तासाचा होता असून त्या तुलनेत २०१९ या वर्षीच्या मेळाव्याहून अधिक आवाजाची तीव्रता नोंदविण्यात आली.
शिवाजी पार्कवर अशी नोंद असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्याचे देखील वेळेनुसार आवाज नोंदणी करण्यात आली. यात सायंकाळी सव्वा पाच वाजाता संगीत सुरु असताना ८०.२ ते ८३.५ डेसिबल इतका आवाज तर किरण पावसकर यांच्या भाषणाच्या वेळी ७८.७ ते ८८.५ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला.
तसेच शिवाजी पाटील बोलत असताना ८२.४ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. तर राहुल शेवाळे यांच्या भाषणाच्या वेळी ७८.८, धैर्यशील माने यांच्यावेळी ८८.५, अरुणा गवळी ८३.९, शरद पोंक्षे यांच्या वेळी ८२.८, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी ८१.७ ते ९१.६ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला. गुलाबराव पाटील ८१ ते ८६, तर रामदास कदम यांच्या भाषणाच्या वेळी ८४.२ डेसिबल इतका आवाज नोंदवण्यात आला.
बीकेसी मैदानावर सर्वाधिक आवाजाची पातळी धैर्यशील माने यांच्या भाषणाच्या वेळी नोंद झाली असल्याचे आवाज फाऊंडेशनकडून सांगण्यात आली. दरम्यान, बीकेसी मैदान हे कार्यालय अस्थापनांनी घेरलेले असून या ठिकाणी निवासी संकुल नसल्याने सायलंस झोनमध्ये मोडत नसल्याचेही सांगण्यात आले.