अनधिकृतपणे जुनी वाहने केली जात आहेत नष्ट
गोदामांवर काम करणाऱ्या कामगारांचे भवितव्य देखील अंधारात
@maharashtracity
By: मिलिंद माने
महाड: भंगार गोदामांवर शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात असून याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यवसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची तोड मोड करत असून याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे.
भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत आहे. गोरगरिबांच्या जीवावर भंगार व्यवसायिक मात्र आपला गलेलठ्ठ झाले आहेत. या भंगार व्यवसाइकांकडून अनधिकृतपणे वाहनांची तोडकाम करणे, रासायनिक कचरा घेणे, घरगुती सिलिंडर वापर करणे, आदी कामे बिनदिक्कत केली जात आहेत.
परप्रांतीय असलेल्या या भंगार व्यवसायिकांकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यातून भंगार व्यवसायिक आणि कामगार याठिकाणी आपला तळ ठोकून आहेत.
औद्योगिक क्षेत्र तसेच महाड शहरात या व्यवसायिकांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या आशीर्वादातून जागा भाडे तत्वावर घेवून व्यवसाय उभे केले आहेत. मात्र याठिकाणी कोणतीच खबरदारी घेतली जात नसून संबंधित शासकीय अधिकारी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आहेत.
महाड शहरात किमान सहा ते सात भंगाराचे गोदामे आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गावर हे व्यवसायिक असून या गोदामांवर शहर तसेच ग्रामीण भागातून गोळा करून आणलेले भंगार स्वीकारले जाते. बहुतांश परप्रांतीय नागरिक या व्यवसायात असून ग्रामीण भागात भंगार घेवून आईस्क्रीम, भांडी, कपडे दिले जातात तर शहरात रोख रक्कम देवून भंगार खरेदी केले जाते.
या भंगार व्यवसायिकांकडून गोळा करून आणणाऱ्या व्यक्तीकडून कमी पैशात भंगार घेवून विक्री मात्र बाजारभावाप्रमाणे केली जात असल्याने सर्वसामान्य, गोरगरिबांच्या पोटावर भंगार व्यवसायिक मात्र गलेलठ्ठ झाले आहेत.
ज्या भाड्याच्या जागेत हि गोदामे आहेत त्या ठिकाणी इमारत नसताना देखील आणि कागदपत्रांचा पत्ता नसताना देखील वीज पुरवठा करण्यात आला आहे. हा वीज पुरवठा करताना देखील महावितरण कडून लाकडी काठ्यांचा आधार देत वीज पुरवठा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवाय महाड नगर पालिकेकडून देखील विचारणा होत नसल्याने भंगार गोदामांवर पाणीपुरवठा देखील केला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला कामे करताना शासकीय नियमांची आडकाठी समोर येते मात्र या भंगार व्यवसायिकांना कशा परवानग्या आणि सोयीसुविधा दिल्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
महाड शहरात असलेल्या प्रमुख मार्गांच्या शेजारीच भंगार गोदामे आहेत. या भंगार गोदामांवर आणि परिसरात अस्वच्छ वातावरण आहे. जागोजागी पडलेले भंगाराचे तुकडे, ड्रम, जुन्या टाक्या, आदीमुळे ऐन पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यूचा प्रसार होण्यास मदत होते.
एकीकडे महाड नगर पालिका आरोग्य विभाग सर्वसामान्य नागरिकाला घरात किंवा घराशेजारी ठेवलेल्या कुंडीत अगर ड्रममध्ये पाणी साचून ठेवल्यास कारवाई केली जाते मात्र भंगार गोदामांवर ऐन पावसाळ्यात साचलेल्या पाण्याबाबत आणि गलिच्छ वातावरणावर कोणतीच कारवाई केली जात नाही.
याचठिकाणी भंगार गोदामांवर काम करणारे कामगार देखील राहतात. औद्योगिक क्षेत्रात तर रासानिक ड्रम, रासायनिक पावडरच्या पिशव्या, साठवून ठेवल्या जातात. या पिशव्या किंवा ड्रम हे कामगार असुराक्षितपणे बाळगतात. यामुळे यापूर्वी अनेक अपघात देखील झाले आहेत.
परिसरात यामुळे रसायन सांडून जमिनीची सुपीकता आणि शेती धोक्यात असताना देखील जागा मालकाशी करार करून कोणत्याच प्रकारची शासकीय परवानगी न घेता या भंगार व्यवसायिकांनी तळ ठोकले आहेत.
भंगार गोदामांवर अनधिकृतपणे वाहनांची तोड
बहुतांश भंगार व्यवसायिकांकडून जुनी वाहने भंगार म्हणून घेतली जातात. परिवहन विभागाची रीतसर परवानगी न घेताच वाहन मालक देखील आपली वाहने भंगार व्यवसायिकांना देतात.
भंगार व्यवसायिक देखील परिवहन विभागाच्या कोणत्याच परवानग्या न काढता आपल्या कामगारांकडून वाहन तोडून नष्ट करतात. जुने वाहन नष्ट झाले असले तरी संबंधित विभागाकडे मात्र या वाहनांची नोंद कायम राहते. किंवा या नंबर प्लेटचा वापर देखील केला जाण्याची शक्यता असते.
प्रत्येक महिन्याला शहरात परिवहन विभागाचा कॅम्प असून देखील आर.टी.ओ. कडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. भंगार व्यावसायिकांकडून होत असलेल्या अनधिकृत कामांची तपासणी करून कारवाई होणे आवश्यक आहे.
महाड शहरात व औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भंगाराच्या गोडाऊनमध्ये विद्युत मंडळाचे निकामी झालेले व चोरून आणलेले विद्युत पोल तसेच भारत दूरसंचार निगमचे दूरध्वनीचे खांब जे ॲल्युमिनियम व त्याचा तळ भिडाचा असतो असे पोल देखील खेडोपाड्यातून गोळा करून त्याची तोडमोड करून ते भंगारात काढले जाण्याचे काम चालू असताना देखील ना भारत संचार निगमचे अधिकारी ना विद्युत मंडळाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने भंगार माफी यांचे मोठ्या प्रमाणावर चोरी चालू आहे.