@maharashtracity
धुळे: बदलत्या युगासोबत धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेने (Dhule DCC Bank) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ग्रामीण भागातही आर्थिक व्यवहारांसाठी एटीएम कार्डचा वापर वाढला आहे. मात्र अनेकवेळा राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएमची कॅश संपलेली असते. त्यामुळे कॅश काढण्यासाठीही लांबच लांब रांग लागते. यावर मार्ग काढण्यासाठी आता मायक्रो एटीएम हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. जिल्हा बँकेला असे २०० मायक्रो एटीएम बसवण्यासाठी नाबार्ड बँकेकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.
मायक्रो एमटीएममध्ये एक छोटेसे डिवाइस असते. ज्यात कार्ड टाकून आणि गुप्त पिन क्रमांक टाकल्यानंतर पैसे जमा करता येतात किंवा काढताही येतात. नाबार्डने जिल्हा बँकेला अशी २०० मायक्रो एटीएम मशीन घेण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
येणार्या काही महिन्यांत जिल्हा बँकेद्वारा ही मायक्रो एटीएम मशीन (ATM) जिल्हा बँकेच्या सर्व शाखांसह काही निवडक सोसायट्यांमध्ये तसेच गावांमध्ये किराणा दुकान, बाजार समित्या या ठिकाणी देण्यात येतील. या मशीनमध्ये शेतकरी एटीएम कार्ड स्वाइप करून पैसे काढू शकतील किंवा त्यांच्या खात्यात पैसे भरूही शकतील.
कोणत्याही बँकेचे कार्ड स्वीकारले जाईल. यामुळे आता गावातील व्यक्तीला तालुक्याच्या ठिकाणी येऊन एटीएमसमोर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. वि.का. सोसायटीत जाऊनही त्याच्या कोणत्याही बँक खात्यात असलेले पैसे मायक्रो एटीएममध्ये कार्ड स्वाइप करून काढू शकेल. यासाठी जिल्हा बँकेद्वारा कोणतेही अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विवेक पाटील आणि धुळे (Dhule) व नंदुरबार (Nandurbar) जिल्हा बँकेचे सीईओ धीरज चौधरी यांनी दिली.