@maharashtracity
पाठपुरावा करण्यास प्रशासन कमी पडतेय
पॅथॉलॉजिस्ट संघटनांचा आरोप
मुंबई: स्वतःची लॅब चालवत इतर तेरा ठिकाणांवरील लॅबमधील वैद्यकीय अहवालांवर त्या ठिकाणी उपस्थित न राहता सही करणाऱ्या डॉक्टरला महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने (Maharashtra Medical Council – MMC) एका वर्षासाठी निलंबित केले आहे. तर दुसऱ्या डॉक्टरला सहा महिन्यासाठी निलंबित करण्याची घटना घडली आहे.
मात्र महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने केलेल्या निलंबनाची (Suspension) कारवाई स्थानिक प्रशासनाला माहित नसल्याने असे अवैध धंदे बहुतांश ठिकाणी सुरुच राहतात. यावरुन स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप पॅथॉलॉजिस्ट (Pathologist) संघटनांकडून होत आहे.
अवैधरित्या वैद्यकीय अहवालांवर सही केल्या प्रकरणी डॉ. राकेश दुग्गल (Dr Rajesh Duggal) यांना एक वर्षासाठी तर डॉ. राजेश सोवनी (Dr Rajesh Sowani) सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही वैद्यकीय अहवालांवर अवैधरित्या सही करत होते. अवैध प्रकरण विरोधात तक्रारी दिल्याशिवाय कारवाई होत नसल्याची कैफियत पॅथॉलॉजिस्ट संघटना मांडतात.
या दोन्ही डॉक्टरांचा एकाहून अधिक पॅथ लॅबमध्ये वैद्यकीय अहवालांवर सहीसाठी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील डॉ. राकेश दुग्गल यांची सांताक्रुझ येथे दुग्गल डायग्नोस्टीक सेंटर लॅब आहे. यासह ते वसई, विरार, जागेश्वरी, अंधेरी, कौसा, मुंब्रा, विक्रोळी घाटकोपर, ठाणे, प्रभादेवी, चांदीवली, मालाड नालासोपोरा येथील लॅबच्या वैद्यकीय अहवालांवर सही करत होते.
Also Read: सावधान ! मुंबईतील हवा सलग तिसऱ्या दिवशीही प्रदुषित
हे डॉक्टर वैयक्तिक पाहणी न करता वैद्यकीय अहवालांवर सही करत करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दरम्यान स्थानिक प्रशासनाने अशा पॅथॉलॉजिस्टवर वेळोवेळी कारवाई करणे आवश्यक आहे. कित्येक जणांवर निलंबनाची कारवाई करुन देखील त्यांचे सही देण्याचे काम सर्रास सुरु असते.
वैद्यकीय परिषदेने कारवाई केल्यानंतर स्थानिक प्रशासन त्याचा पाठपुरावा करत नसल्याने त्यांचे अवैध धंदे सर्रास सुरु असतात. स्थानिक प्रशासनाचा अंकुश नसल्यानेच अवैध धंदे सुरु असतात. मुळात स्थानिक प्रशासनाकडे पॅथॅलॉजिस्टची यादी नसल्याने अवैध काम करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट्स (Maharashtra Association of Practising Pathologist) संघटनेकडून केला जात आहे.
दरम्यान, पॅथॅलॉजिस्ट नोंदणी नसल्याने वैद्यकीय परिषदेने निलंबनाची कारवाई केली तरी त्याचा पाठपुरवा होत नाही. त्यातून अवैध धंदे करणाऱ्या पॅथॅलॉजिस्टचे पेव फुटले असल्याचा आरोप पॅथॉलॉजिस्ट संघटना करत आहेत.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट्स संघटनेकडून मुंबई महानगरपालिका आयुक्तांना (BMC Commissioner) पत्र पाठविण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील लॅबोरेटरीचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी करण्यात आली होती. मान्यताप्राप्त लॅबधारक वैद्यकीय चाचण्या तपासण्या करु शकतील. रोगाचे निदान करण्यास मदत होईल. अवैध व्यवसाय आढळून आल्यास उपकरणे, केमिकल्स, रिपोर्ट, रजिस्टर आदी सील करुन महाराष्ट्र वैद्यक व्यावसाय अधिनियमाने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली.