@maharashtracity

१४ जण जखमी

मुंबई: वांद्रे (पूर्व), एमटीएनएल जंक्शन, ट्रेड सेंटर, बीकेसी (BKC) या ठिकाणी निर्माणाधिन उड्डाणपुलाचा गर्डर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले.

सर्व जखमींना मुंबई महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असंल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे डॉक्टर शशांक यांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, एमएमआरडीए प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून वांद्रे, एमटीएनएल जंक्शन, बीकेसी या ठिकाणी सध्या एका उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचा गर्डर शुक्रवारी पहाटे मुंबईकर झोपेत असताना अचानकपणे कोसळला. त्याबरोबर मोठा आवाज झाला.

यावेळी, या पुलाचे बांधकाम करणाऱ्या अंदाजे २५ कामगारांपैकी काही कामगारांनी गर्डर कोसळत असतानाच जीव वाचविण्यासाठी पुलाच्या भागावरून खाली उड्या मारल्या. तर काहीजण पाण्याच्या टाकीत पडले. या एकूण दुर्घटनेत १४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

त्यांना मार लागल्याने ते कमी- अधिक प्रमाणात जखमी झाल्याचे समजते. सुदैवाने या गर्डरच्या खालील भागात कोणी कामगार दबला गेला नाही अथवा सापडला नाही, असे एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ही दुर्घटना भल्या पहाटेच्या सुमारास काहीशा अंधारात घडल्याने नेमके कोणाला किती प्रमाणात मार लागला व कोण किती गंभीर जखमी झाले हे नीटपणे समजू शकलेले नाही. मात्र या सर्व जखमींना तातडीने पालिकेच्या व्ही. एन.देसाई रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही दुर्घटना का व कशी काय घडली, त्याला जबाबदार कोण याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एमएमआरडीएचे अधिकारी आदी यंत्रणा अधिक तपास करीत असल्याचे समजते.

जखमींची नावे –

१) अनिल सिंह (२८)
२) अरविंद सिंह (२९)
३) अझहर अली (२६)
४) मुश्ताक अली (२८)
५) रियाझउद्दीन (२३)
६) मोतलाब अली (२८)
७) रियाझु अली (२१)
८) श्रवण (४९)
९) अतिश अली (२२)
१०) रईस अली (२२)
११) अझीझ उल हक (२९)
१२) परवेझ (२२)
१३) अकबर अली (२५)
१४) श्रीमंद (२५)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here