ऐतिहासिक कावड यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
@maharashtracity
औरंगाबाद: विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या ऐतिहासिक कावड यात्रेत “हर हर महादेव”- “बम बम भोले” च्या गजराने आज औरंगाबाद (Aurangabad) शहर दुमदुमून गेले.
शहरातील ठीकठिकाणाहून कावड, भगवे ध्वज घेऊन शिवभक्त, हिंदू बांधव नागरिक मोठ्या संख्येने उल्कानगरी येथील ओमकारेश्वर महादेव मंदिरात भल्या पहाटेच एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. मागील पाच वर्षाची परंपरा कायम ठेवत विधान परिषद विरोधी पक्ष नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या संयोजनाखाली ही कावड यात्रा काढण्यात आली. मागील दोन वर्षाच्या काळात कोविडमुळे प्रतिकात्मक कावड यात्रा (Kavad Yatra) काढून परंपरा जपण्यात आली होती.
आज सकाळीच अंबादास दानवे, सौ. अनुराधा दानवे यांनी तसेच विभागप्रमुख अनिल लहाने यांच्या हस्ते सपत्नीक ओंकारेश्वर महादेवाची महापूजा आरती करून जलपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्याहस्ते कावड पूजन व श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यात्रेच्या अग्रभागी भगवान शंकर पार्वतीच्या व भगवान महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. यावेळी ओंकारेश्वर मंदिर उल्कानगरी ते खडकेश्वर महादेव मंदिरापर्यंत ठीक ठिकाणी विविध दांपत्यांनी, नागरिकांनी कावड यात्रेचे पूजन केले.
संगीताच्या तालावर तरुण मंडळी, महिला माता-भगिनी नाचत वाजत वाजत गाजत कावड घेऊन चालत होते. कावड यात्रेच्या अग्रभागी शेकडो महिला डोक्यावर जलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी फटाक्याची आतिषबाजी, पुष्पवृष्टी करत कावड यात्रेचे स्वागत केले. या वेळी खडकेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यात आला.
कावड यात्रेत हर हर महादेव, शंकर भगवान की जय, बम बम भोले या जय जयकारामुळे अवघे औरंगाबाद शहर भगवेमय, भक्तिमय झाले होते. या कावड यात्रेचा हिंदू संघटन करणे, हिंदू संस्कृती, हिंदू सण, व्रतवैकल्ये, रीती रिवाज याची जपणूक करणे हा प्रमुख उद्देश आहे, असे संयोजक विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी सांगितले.