@maharaahtracity
मंडईतील मासेविक्रेत्यांना व्यवसायासाठी तात्पुरती सुविधा
मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध मनीष मार्केटजवळील (Manish Market) पालिकेच्या मालकीच्या शिवाजी मंडईचे (Shivaji Market) बांधकाम धोकादायक झाल्याने कोर्टाच्या आदेशाने ते टप्प्याटप्प्याने पूर्णपणे पाडण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या मार्केटमधील मासे विक्रेत्यांचे नजीकच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये ऑगस्ट २०२२ पर्यन्त कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार आहे.
मात्र त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने या मासेविक्रेत्यांची गैरसोय होऊ नये व त्यांना दैनंदिन व्यवसाय निर्विघ्नपणे करता यावा यासाठी पालिका त्यांना शिवाजी मंडईच्या जागेतील परिसरातच तात्पुरत्या स्वरूपाची शेड एका वर्षात बांधून देण्यात येणार आहे.
त्यासाठी महापालिकेने (BMC) मेसर्स वीर इन्फ्राप्रोजेक्ट या कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका या कंत्राटदाराला ३ कोटी ३४ लाख ९० हजार रुपये मोजणार आहे.
यासंदर्भातील प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
मनीष मार्केटच्या शेजारी असलेली पालिकेची छत्रपती शिवाजी महाराज मंडई तळघर + तळमजला + चार मजली इमारत कालपर्यंत अस्तित्वात होती. या इमारतीत तळमजल्याला मासळी बाजार होता. मात्र मंडईची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत होती. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास संबंधित पालिका अधिकारी, महापौर, स्थानिक नगरसेवक यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.
दरम्यान, पालिकेने २०१८ पर्यन्त मंडईच्या दुसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंतचे मजले निष्कासीत केले होते. मात्र तळघर ते पहिला मजल्याचे धोकादायक बांधकाम पडण्याचे काम बाकी होते. ते काम गेल्या आठवाड्याभरात पूर्ण करण्यात आले. मात्र आता या मंडईमधील मासेविक्रेत्यांना क्रॉफर्ड मार्केटमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यास वेळ लागणार असल्याने व क्रॉफर्ड मार्केटमध्ये सध्या दुरुस्ती व विस्तार करण्याचे काम सुरू असल्याने या मासे विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय अविरत सुरू ठेवण्यासाठी पालिकेने त्यांच्यासाठी मंडईच्या परिसरातच तात्पुरती शेड बांधण्याचे काम मेसर्स वीर इन्फ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे.