एक वर्षानंतही तळीये दरडग्रस्तांना आठवणीने अश्रूंचा पूर कायम

@maharashtracity

By: मिलिंद माने

महाड : २२ जुलै रोजी सर्वत्र पडणारा धो धो पाउस आणि नद्यांना आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचवणारा प्रत्येकजण उघड्या डोळ्याने घराचे होणारे नुकसान पाहत असतानाच एक धक्कादायक बातमी प्रशासनाच्या कानावर आली. तळीये ( Taliye) गावात दरड कोसळली. नेमके काय झालय हे कळायच्या आतच डोंगराचा एक भाग तळीये गावाच्या कोंडाळकर वाडीवर आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेला आज एक वर्ष होत आहेत.

या दुर्घटनेच्या आठवणीने प्रत्यक्षदर्शी आणि वाचलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रूचा महापूर कांही थांबताना दिसत नाही.

२२ जुलैला महाडवर अस्मानी संकट कोसळले होते. प्रचंड प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले होते. अशातच २२ जुलैला महाड तालुक्यातील तळीये गावच्या कोंडाळकरवाडीवर दरड कोसळली अशी धक्कादायक बातमी प्रत्येकाच्या कानावर आली.

गावच्या जवळ असणारा डोंगरातील दगडमातीचा भराव पावसाचा पाण्याबरोबर वाहून वाडीतील घरांवर आला. आणि यात कोंडाळकरवाडीतील ३६ घरे उध्वस्त झाली. या भयानक घटनेमध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला.

अनेक घरं, जनावरे, माणसे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेला २२ जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आपले घरदार, नातेवाईक तसेच सर्वस्व गमावलेले अनेक ग्रामस्थ आज एका तात्पुरत्या कंटेनर हाऊस मध्ये राहात आहेत.

एका बाजूला नातेवाईकांच्या आठवणी तर दुसरीकडे कंटेनर हाऊसमदील वास्तव्य अशा अडचणीत ग्रामस्थ आहेत. कमी जागेमध्ये असलेल्या या घरांमध्ये त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत एक वर्ष ढकलले आहे.

महाडच्या कडाक्याच्या उन्हामध्ये उन्हाने तापणाऱ्या कंटेनरमध्ये अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली आहे. आता पावसाळ्यात देखील या कंटेनरमध्ये त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे.

अशातच अनेक ग्रामस्थांनी कंटेनर बाहेरच ताडपत्री टाकून तात्पुरती शेड उभारली आहे. यामध्ये कपडे वाळत घालणे ,शेती अवजारे व इतर कामांसाठी जागा करून घेतली आहे . गावामध्ये असलेले भले मोठे घर दरडीखाली गेल्यानंतर अत्यंत छोट्या जागेमध्ये या ग्रामस्थांचा संसार वर्षभर सुरू आहे. परंतु आता येथील ग्रामस्थांना आपल्या घराचे वेध लागले आहेत.

ही दुर्घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणेने तत्परतेने आपले मदत कार्य सुरू केले. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली. बेघर झालेल्या ग्रामस्थांना घरे देण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला.

महसुल विभागाकडून ( revenue ministry) तातडीने या ठिकाणी १७ हेक्टर ३८ गुंठे जमीन संपादीत करून देण्यात आली. परंतु या सर्व कामकाजाला काही कालावधी लागला आहे. याच काळामध्ये आता म्हाडा कडून घरे उभारण्यासाठी पायथ्याचे काम प्रगतीपथावर आहे.

याठिकाणी तयार स्वरूपातील घरे उभी करून दिली जाणार आहेत. सुरुवातीला कमी क्षेत्रफळाची घरे ग्रामस्थांना दिली जाणार होती. परंतु आता गावातील गरज लक्षात घेता प्रत्येकाला सहाशे स्क्वेअर फुटाचे घर व तीन गुंठे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुनर्वसनाचे काम सुद्धा सुरू झाले तरी घरे उभारणी नंतर या ठिकाणी वीजपुरवठा, पाणीपुरवठा, रस्ते व इतर नागरी सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र अनुदान देखील दिले जाणार आहे.

या गावांच्या पुनर्वसनाकरता भूसंपादन व इतर नागरी सुविधांकरता लागणारा निधी शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे. तळीये कोंडाळकर वाडीतील ६६ कुटुंबांना या ठिकाणी घरे दिली जाणार आहेत. परंतु सरकारने संपूर्ण तळीये गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याने २७२ घरे या ठिकाणी बांधून दिले जाणार आहेत.

सरकारी पातळीवर बेघर झालेल्यांना प्राधान्याने घरी बांधून दिली जाईल अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.आपल्या व्यथा मांडताना एक वर्षापूर्वी आलेले संकटाची आठवण येताच त्यांचे मन भावूक होते.

यावेळी सखाराम विठ्ठल गंगावणे यांनी आपल्या डोळ्यात देखत मुलाला दरडी खाली अडकलेला पाहिला. आजही आपल्या मुलाला आपण सुखरूप बाहेर काढू शकलो याचा आनंद त्यांना असला तरीही संपूर्ण गाव दरडी खाली गेला याचे दुःख देखील त्यांच्या मनावर आजही दिसून आले.

याच घटनेत वाचलेला त्यांचा मुलगा अनिल गंगावणे हा अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला. आपल्या आठवणी सांगताना तो भयभीत देखील झाला होता. त्या आठवणी ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते.

साडेचार पाच वाजता छोटी दरड खाली आली ती पाहण्यासाठी माझ्यासोबत दोन माणसे व मी गेलो होतो आणि त्याचवेळी प्रचंड मोठी दरड आली आम्हीच पळू लागलो. माझ्यासोबतची माणसे दरडी खाली गाडली गेली. मी ही गाडला गेलो होतो. परंतु माझ्या वडिलांनी व भावानी मला येथून कसेबसे बाहेर काढले. कित्येक महिने मी जे जे रुग्णालय व पुण्यामध्ये खाजगी उपचार घेतले.

दोन्ही पायाची ऑपरेशन झाल्यानंतर आपण उभे असलो. तरीही कुटुंबाची जबाबदारी कशी पार पडणार या दुःखाने अनिल गंगावणे आजही बेजार आहेत. त्यांनी प्रत्यक्ष घटना घडलेल्या ठिकाणी नेऊन आपल्या आठवणीत कथन केल्या. तर प्रतिभा कोंडाळकर यांना आजही आपल्या सासू – सासर्‍यांच्या आठवणीने गहिवरून येते.

त्या दिवशीचा पाऊस महाभयंकर असा होता. दरडीच्या भीतीने आम्ही सर्वजण घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणामध्ये जमा झालो होतो. परंतु दरडीने बाहेर येण्याचा वेळ देखील आम्हाला दिला नाही. मी माझ्या मुलीला घेऊन घराच्या बाहेर पळाले. परंतु समोरून येणारा मला मोठा ओसरा गावातील घरे घेऊन निघाला होता. यातच माझे सासू – सासरे देखील होते असे सांगितले.

चंद्रकांत पोळ या तरुणाची व्यथा काही वेगळीच. आदल्या दिवशी त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला बाहेरगावी पाठवले होते. त्यामुळे हे दोघे बचावले. परंतु तो दिवस खूपच विचित्र असा होता गावातील सर्वांना बाहेर काढायचे होते वृद्ध लहान या सर्वांना घराबाहेर काढण्याची आमची घाई होती. आई – वडिलांनी आग्रह केला म्हणून मी मोठ्या भावाची पत्नी आणि त्याच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडलो. त्यांना सुरक्षित स्थळी ठेवून परत येत असतानाच माझ्यासमोरच दरडीने आई-वडिलांना नेले हे सांगताना चंद्रकांत यांना आपल्या भावना आवरता येत नव्हत्या.

तळीयेमधील मुलं गिरवताहेत कंटेनर शाळेत धडे – दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेली गावातील शाळा अक्षरश : ओस पडली आहे. सध्या एका कंटेनरमध्ये शाळा भरवली जाते. या दरडीच्या दुर्घटनेत शाळेतील पाच मुले मरण पावली. त्यांच्या आठवणीने येथील शिक्षक शिवाजी मांढरे खूपच भावूक झाले. आजही ती चिमुकली मुले आमच्या सोबत आहेत असे वाटते. त्यांचा सहवास त्यांचा खेळणे बागडणे हे विसरता येत नसल्याची खंत शिवाजी मांढरे यांनी यावेळी व्यक्त केली.

याच दरम्यान शाळेतील चौथी मध्ये शिकणारा मुलगा परम कोंडाळकर त्या दुर्घटनेचा साक्षीदार होता. या चिमुकल्याने देखील रडत रडत आपल्या आठवणी सांगितल्या. आपली बहीण आई आम्ही अनेक जण या दरडीच्या काचाट्यातून कसेतरी बाहेर पडलो हे सांगताना आपले मित्र गमावल्याचे दुःख देखील त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

नव्या प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पात शाळा बांधली जाणार आहे. म्हाडाकडून शाळेच्या इमारतीचा पाया बांधला जात आहे. लवकरच आम्हाला नवी शाळा मिळावी अशी आशा येथील विद्यार्थ्यांना आहे.

तळीयेच्या या दुर्घटनेला एक वर्षाचा कालावधी लोटला असला तरी आजही येथील ग्रामस्थ ती घटना विसरलेले नाहीत. असा दिवस, असे दुःख कोणाच्याही वाटायला येऊ नये अशीच त्यांची इच्छा आहे.

आपले घरदार, सर्वस्व गमावल्यानंतर कंटेनरमध्ये आपले जीवन ढकलत असणारे हे दरडग्रस्त उद्या सरकारने बांधून दिलेल्या घरामध्ये राहण्यासाठी जातीलही, त्यांचे पुनर्वसन देखील होईल. परंतु जे गमावले आहे, जे आपल्याला सोडून गेले आहेत ते पुन्हा कधीही येणार नाही ही सल मात्र त्यांच्या मनात दडून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here