@maharashtracity

उच्चस्तरीय चौकशी करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी

By मिलींद माने

महाड (रायगड): छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) राजधानी असणाऱ्या महाड जवळील ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरील (Raigad Fort) पायरी मार्ग व संरक्षक भिंतीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना वाहतूक सेनेचे (Shiv Sena) अध्यक्ष सुभाष मोरे व शिवाजी शिंदे प्रभाकर सावंत यांनी केली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या कामावर आक्षेप घेत किल्ल्यावर केल्या जाणाऱ्या कामाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली आहे.

रायगड विकास प्राधिकरणाच्या (Raigad Development Authority) माध्यमातून छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील दुरुस्ती कामे शिवकालीन तंत्राचा वापर करून करण्यात येत असल्याचा दावा रायगड प्राधिकरणाकडून केला जात आहे. मात्र, या बांधकामातील दगड काही कालावधीत निखळून पडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य मातीच्या ढेकळाप्रमाणे फुटत असून कोणतेही काम मजबूत स्थितीत नसल्याचे आढळून येत आहे. रायगड संवर्धनाच्या नावाखाली याठिकाणी सुरू असलेली कामे व काम करणाऱ्या एजन्सी स्थानिक नसल्याने व त्यांना स्थानिक परिसरात पडणाऱ्या पावसाचा अंदाज नसल्याने घिसडघाई पद्धतीने रायगड किल्ल्यावरील पायरी मार्ग व संरक्षण भिंतीचे काम केले गेले आहे.

वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ले रायगड आज निकृष्ट बांधकामासाठी चर्चेत येतोय. ही बाब शिवप्रेमी म्हणून लाजिरवाणी आहे. याबाबत आम्ही स्थानिक ग्रामस्थांना घेऊन रायगड किल्ल्यावरील दोन ते तीन वर्षापूर्वी झालेल्या दगडी बांधकामाची पाहणी केली असता ते बांधकाम निखळून पडल्याचे आम्हाला प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसले. हे बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की त्यामुळे संपूर्ण रायगडवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे, असे सुभाष मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, असा रायगड हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे. ज्या गडावर महाराजांनी देह ठेवला तो किल्ले रायगड आम्हाला शिवप्रेमींसाठी तीर्थ-क्षेत्रापेक्षा कमी नाही. असे सांगून किल्ले रायगडावरील निकृष्ट दर्जाचे काम ही कल्पना आम्ही सहन करू शकत नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवर करण्यात आलेल्या बांधकामाची तज्ञांकडून तपासणी केली जावी व दोषींवर कठोर कारवाई केली जावी. तसेच किल्ले रायगडच्या नित्कृष्ट कामात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्वांच्या संपत्तीची मार्फत चौकशी केली जावी, त्याचा अहवाल आम्हाला माहितीसाठी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अर्जाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे.

तसेच आमच्या अर्जाची गंभीर दखल घेतली नाही, वेळेत कार्यवाही झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारादेखील ग्रामस्थांनी या पत्राद्वारे दिला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी लक्ष घातले

रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असल्याचे समजताच खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी या कामात सुधारणा करण्याचे निर्देश रायगड प्राधिकरणाला दिले. या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशाराही यांनी दिला.

तसेच रायगड किल्ल्यावरील निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) दक्षता व गुणनियंत्रण विभागाला या कामांची पाहणी करण्याच्या सूचना देणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरी रायगड प्राधिकरणाचे काम करणाऱ्या कार्यकारी अभियंता विश्वनाथ सातपुते यांची बदली झाल्यानंतर या कामाची देखरेख ठेवण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी नसल्याने या प्राधिकरणाअंतर्गत काम करणारे कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या कामात हलगर्जीपणा केल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एकंदरीत रायगड प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत संशयाची सुई या सर्व शाखा अभियंता यांच्याकडे जाते असे समजते. तसेच रायगड प्राधिकरणाचे काम करणारे सर्व ठेकेदार (contractor) व एजन्सीधारक यांचे लागेबांधे कनिष्ठ अभियंतापर्यंत असल्याने या सर्वांची ई.डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी ग्रामस्थांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here