मागण्या निकाली लावण्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांचे आश्वासन
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यातील मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संपाला सुरुवात केली होती. यावेळी डॉक्टरांच्या वसतीगृहांची मागणी, डॉक्टरांची पदभरती अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. मंगळवारी वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यवर्ती मार्डच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी डॉक्टरांच्या मागण्यांचा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन देण्यात आले. आश्वासनानंतर मध्यवर्ती मार्डने संप मागे घेतल्याचे घोषित केल्याचे मंत्री महाजन यांच्याकडून सांगण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा मागे घेण्यात आला आहे. यात गिरीश महाजन यांनी डॉक्टरांच्या हॉस्टेल उभारणीचे काम तात्काळ सुरू करू, तसेच चांगल्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल, सिनियर डॉक्टरांची पदे भरण्यात येतील, अशी आश्वासने दिली. ही चर्चा मार्डच्या शिष्टमंडळासोबत करण्यात आली असल्याचे महाजन यांनी सांगितले. तसेच वसतीगृहांची अवस्था तसेच अपुऱ्या जागेवर उपाय म्हणून डॉक्टरांना रुग्णालयाबाहेरील इमारतीत जागा उपलब्ध करुन दिली जाईल, रुमचे भाडे व प्रवास खर्च दिला जाणार आहे. इतर मागण्यांवर तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले.