@maharashtracity

मेस्माच्या कारवाईने वाहकाचे निधन झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

धुळे: एसटी महामंडळातील एका वाहकाचा शुक्रवारी दुपारी हृदयविकराचा झटका आल्याने निधन झाले. हा कर्मचारी संपात सहभागी होता. शासनाने मेस्माअंतर्गत कारवाईला सुरुवात केल्याच्या भीतीमुळे वाहकाचे निधन झाल्याचा दावा कुटुंबियांसह एसटीच्या कर्मचारी संघटनांनी केला. यानंतर नातेवाईकांसह कर्मचारी संघटनांनी वाहकाचा मृतदेह थेट विभागीय कार्यालयात आणून अर्धातास आंदोलन केले. वाहकाला धमकाविणार्‍याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबियांसह संघटनेने केली होती.

एसटी कर्मचार्‍यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कामगार, कर्मचार्‍यांचे गेल्या 39 दिवसांपासून धुळे आगारात आंदोलन सुरु आहे. संपात सहभागी असलेल्या कर्मचारी, कामगारांविरुध्द शासनाने मेस्मा अंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. यातील काही कर्मचारी आधीच निलंबीत आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांना शेवटची संधी देऊन कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. परंतू, काही कर्मचारी, कामगार अजूनही त्यांच्या विलीनकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे दोन दिवसांपासून काही कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई सुध्दा करण्यात आली आहे. ती पुढेही सुरुच राहणार आहे.

धुळे एसटी आगारात कार्यरत वाहक एस.वाय.सोनवणे हे देखील संपात सहभागी होते. ते शुक्रवारी जेवणानंतर घरीच टिव्हीवरील एसटी संदर्भातील बातम्या बघत असतानाच त्यांना जोरदार हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ही माहीती अन्य कर्मचारी, कामगारांना कळताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहक संजय सोनवणे यांना कुठलाही आजार नव्हता. परंतू, गेल्या 15 दिवसांपासून त्यांना विभागीय कार्यालयातील पी.जी.पाटील, समाधान खांडेकर यांच्याकडून वेळोवेळी कामावर हजर होण्यासाठी दबाव येत होता. तसेच संप काळातही विविध ठिकाणी बदलीची धमकी येत होती, अशी माहिती वाहक सोनवणे यांच्या पत्नी वंदना सोनवणे यांनी माध्यमांना दिली.

शुक्रवारी दुपारी सोनवणे टिव्हीवरील एसटी संदर्भातील बातम्या बघत असतानाच पुन्हा पाटील व खांडेकर यांचा दुरध्वनी आला. यानंतर सोनवणे यांना जोरदार हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले, असेही वंदना सोनवणे यांनी सांगितले.

वाहक सोनवणे यांचा मृतदेह विभागीय कार्यालयाच्या आवारात आणून तब्बल अर्धातास कामगार संघटनांनी आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी कामगारांची समजूत घालून कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यानंतर वाहक सोनवणेंचा मृतदेह पुढील विधीसाठी नेण्यात आला. मात्र, अशा प्रकारे राज्य शासन आणखी किती कामगारांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here