Twitter: @maharashtracity
मुंबई: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील चतुर्थ, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. रविवारी संपाचा सहावा दिवस होता. रविवार असल्याने संपकरी कर्मचारी रुग्णालयात फिरकलेही नाही. मात्र रुग्णांचे हाल अधिक बिकट झाले आहेत. तरीही शिकावू डॉक्टर, काही कंत्राटी कर्मचारी रुग्णसेवा करताना आढळून आले. काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि पालिकेच्या नर्सेसवर सध्या राज्य सरकारी रुग्णालयातील रूग्ण सेवा जेमतेम सुरु आहे. रुग्णालयीन परिसरात अस्वच्छता जैसे थे अवस्थेत असून रुग्णांना त्यांचे नातेवाईक मदत करत आहेत.
पालिकेच्या परिचारिकांची मदत
रविवारी अत्यावश्यक शस्त्रक्रियाच्या शेड्युल प्रमाणे तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. संपावर न गेलेल्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या मदतीला पालिकेच्या परिचारिका असल्याचे जे जे रुग्णालय समुहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. मात्र संप तसाच सुरु असल्याचे सांगत रुग्णसेवेचे नियोजन सुरु असल्याचे डॉ. सापळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालिकेच्या परिचारिका सरकारी रुग्णालयात अजून किती दिवस येणार हे संपावर अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास रुग्णसेवा अडचणीत आली असल्याचे चित्र आहे.
रुग्णांना जेवण बाहेरून
वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णांना नेहमी जेवण देण्यात येते. मात्र संप सुरु झाल्यापासून रुग्णांची आभाळ होऊ नये म्हणून जेवण बाहेरून मागविण्यात येत आहे. दरम्यान, संपाच्या सुरुवातीचे तीन दिवस सामाजिक संस्थांनी रुग्णाना जेवण पुरविण्याचे काम केले. मात्र त्यानंतर जेवण बाहेरून मागविण्यात येत आहे.