आरोग्य संशोधन विभागाचे राज्यातील दुसरे संशोधन केंद्र
Twitter : @maharashtracity
मुंबई: आरोग्य संशोधन विभागाने नाशिक, वणी येथे दुसरे संशोधन केद्र उभारण्याची मंजूरी दिली असून या संशोधन केंद्रांसाठी ७ कोटीची तरतूद केली आहे. त्यापैकी दीड कोटी रुपये सरकारने संस्थेला दिली असल्याची माहिती आहे. आयसीएमआर आणि राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेचे उपसंचालक डॉ. राहुल गजभिये यांची या प्रकल्पासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राज्य सरकारकडून डॉ. कपिल अहेर, डॉ. सारिका पाटील यांची सुद्धा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
हे राज्यातील दुसरे संशोधन केंद्र असून राज्यातील पहिले ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र डहाणू येथे सुरु आहे. हे केंद्र नाशिकच्या वणी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात उभे राहणार आहे. या जागेची पाहणी उपसंचालक डॉ. राहुल गजभिये यांनी केली असून आगामी काही काळात या संशोधन केंद्राचे काम सुरु होणार आहे. या संशोधन केंद्रासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. तसेच या संशोधन केंद्रात एकूण ८ संशोधन टीम राहणार आहेत. तर धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक येथील भविष्यात होणाऱ्या संशोधनात सहभाग घेणार आहेत. वणी येथील मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट हे शेजारील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात ही संशोधनामार्फत सेवा देणार असल्याचे सांगण्यात आले.