मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार उद्धघाटन
By Anant Nalawade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: नागपूर आणि मुंबईला वेगाने जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या २६ मे रोजी लोकार्पण होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता महामार्गाचे उदघाटन होईल. या लोकार्पणाच्या कार्यक्रमाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला कमी वेळेत जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या पहिल्या टप्प्याला वाहनचालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा येत्या २६ मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे.
समृद्धीचा तिसरा टप्पा हा भरवीर ते भिवंडी असा आहे. संपूर्ण महामार्ग हा जुलै २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मात्र, तिसऱ्या टप्पाचे काम अजून बाकी असल्याने संपूर्ण महामार्ग खुला होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.