मृताच्या खात्यावरील पैशाचा अपहार

विधवा पत्नीची पोलिसांकडे धाव

@maharashtracity

अंबाजोगाई (बीड): बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेत मृत व्यक्तीच्या खात्यावरील पैसे बँक कर्मचा-यांशी संगनमत करून परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत मृताच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली असून बँक कर्मचारी आणि संबंधित घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येल्डा, ता. अंबाजोगाई येथील रहिवासी भाऊसाहेब दामू चामनर यांचे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंबाजोगाई शाखेत खाते आहे. त्यांचा खाते क्रमांक 000411002011470 असा आहे. या खात्यावर भाऊसाहेब चामनर यांनी मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी काही रक्कम ठेवली होती. दुर्दैवाने भाऊसाहेब चामनर यांचे 16 मार्च 2016 रोजी अकस्मिक निधन झाले.

पतीच्या अकस्मिक झालेल्या निधनाचा धक्का त्यांची पत्नी परिमाळा भाऊसाहेब चामनर यांना बसला. या दुःखातून सावरल्यानंतर परिमाळा या त्यांच्या पतीच्या नावे जमा असलेल्या रकमेबद्दल चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या. तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ परत पाठविण्यात आले. तोंडी मागणी करून, अर्ज करूनही बँक कर्मचारी माहिती देत नाहीत, असे पाहिल्यानंतर हवालदिल झालेल्या परिमाळा यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. तरीही बँकेच्या निगरगट्ट अधिकारी, कर्मचारी यांनी माहिती दिली नाही.

अखेर वकीलामार्फत जाऊन त्यांनी पतीच्या नावाचे बँक स्टेटमेंट मिळविले तेव्हा त्यांच्या पतीच्या नावावरील रक्कम परस्पर हडप केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांना कमालीचा धक्का बसला. पतीच्या निधनानंतर एकुलत्या एका मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी ठेवलेली रक्कम अशी गायब झाल्याने त्या कमालीच्या हवालदिल झाल्या. अखेर त्यांनी याबाबत न्याय मिळविण्यासाठी पोलिसांत धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here