@maharashtracity
मुंबई: मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या भेडसावत असते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण हे जास्त असते. तसेच, डांबरी रस्त्यांचा हमी कालावधी हा कमी असतो. मात्र सिमेंट काँक्रिट रस्त्यांचा हमी कालावधी हा अधिक असतो. त्यामुळे पालिकेने आता खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी जास्तीत जास्त सिमेंटचे रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे.
त्यानुसारच पुढील दोन वर्षात पश्चिम उपनगरातील ९ प्रभागात तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या सिमेंटच्या रस्त्यांमुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना खड्ड्यांच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. अशाच पद्धतीने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे शहर व पूर्व उपनगरात करण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांत मुंबईकरांना दर्जेदार व खड्डेमुक्त रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत.
यासंदर्भातील माहिती पालिका रस्ते विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
झोन -३ मध्ये १ हजार १७१ कोटींचे रस्ते
पश्चिम उपनगरातील झोन – ३ मधील (एच/ पश्चिम, एच/ पूर्व, के/ पूर्व) वांद्रे, खार, अंधेरी (पूर्व) आदी परिसरात अंदाजे १९१ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये, डांबरी व पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे परिवर्तन सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे.
तसेच, जंक्शनच्या ठिकाणी मास्टिक काम करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ हजार १७१ कोटी ५१ लाख ४९ हजार ९८१ रुपये खर्चण्यात येणार आहेत.
झोन – ४ मध्ये १ हजार ५५५ कोटींचे रस्ते
पश्चिम उपनगरातील झोन – ४ मधील ( के/पश्चिम, पी/दक्षिण , पी/ उत्तर) अंधेरी/ पश्चिम, गोरेगाव, मालाड आदी परिसरात काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
यामध्ये, डांबरी व पेव्हर ब्लॉक व काही खराब रस्त्यांचे परिवर्तन सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच, जंक्शनच्या ठिकाणी मास्टिक काम करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ हजार ५५५ कोटी ५९ लाख ९८ हजार ३०३ रुपये खर्चण्यात येणार आहेत.
झोन – ७ मध्ये १ हजार ७३ कोटींचे रस्ते
पश्चिम उपनगरातील झोन – ७ मधील (आर/दक्षिण, आर/ मध्य, आर/ उत्तर) कांदिवली, बोरिवली, दहिसर आदी परिसरात काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
यामध्ये, डांबरी व पेव्हर ब्लॉक व काही खराब रस्त्यांचे परिवर्तन सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच, जंक्शनच्या ठिकाणी मास्टिक काम करण्यात येणार आहेत. त्यासाठी १ हजार ७३ कोटी ९३ लाख ६५ हजार ७३२ रुपये खर्चण्यात येणार आहेत.
एकूण ३ हजार ८०० कोटींची रस्ते कामे
पश्चिम उपनगरातील झोन -३ मध्ये १ हजार १७१ कोटी ५१ लाख ४९ हजार ९८१ रुपयांची रस्ते कामे , झोन – ४ मध्ये १ हजार ५५५ कोटी ५९ लाख ९८ हजार ३०३ रुपयांची रस्ते कामे आणि झोन – ७ मध्ये १ हजार ७३ कोटी ९३ लाख ६५ हजार ७३२ रुपयांची रस्ते कामे अशी एकूण ३ हजार ८०१ कोटी ५ लाख १४ हजार १६ रुपयांची रस्ते कामे पुढील दोन वर्षात करण्यात येणार आहेत.