राज्यात ४०२४ नवीन रुग्ण
सार्वजनिक आरोग्य विभाग अलर्ट: राजेश टोपे
मुंबई: राज्यात बुधवारी ४,०२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१९,४४२ झाली आहे. आज ३०२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५२,३०४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण १९२६१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी २ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१४,२८,२२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१९,४४२ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २,२९३ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,८४,९६० रुग्ण आढळले. तसेच १ रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५७६ एवढी झाली आहे.
बीए.५ व्हेरियंटचे ४ रुग्ण
पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण आढळून आले आहेत. या पैकी प्रत्येकी १ रुग्ण मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथील आहे. हे सर्व रुग्ण १९ ते ३६ वर्षे वयोगटातील महिला आहेत. यापैकी ३ रुग्णांची जनुकीय क्रमनिर्धारण तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि एका रुग्णाची तपासणी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे करण्यात आलेली आहे. हे सर्व रुग्ण २६ मे ते ९ जून २०२२ या कालावधीतील असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
आरोग्य विभाग अलर्ट:
राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड अशा मर्यादित ठिकाणीच रुग्णसंख्या वाढत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तर मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट ४० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. राज्यात रुग्ण वाढ होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी दोन ते तीन टक्के इतकीच आहे.
आरोग्य विभागाकडून हर घर दस्तक मोहिमेतून आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती देणार आहेत. यातून लसीकरणाचे प्रमाण वाढणार आहे. तसेच राज्यात शाळा सुरु झाल्याने १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते करुन घेण्याच्या सुचना पालकांना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची आवाहन टोपे यांनी यावेळी केले.