महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे स्वगृही सुखरूप परतले
Twitter: @maharashtracity
नवी दिल्ली: सुदानमध्ये अंतर्गत संघर्षामुळे तेथील नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. भारत सरकारच्या विशेष विमानांनी रात्री 360 भारतीय नागरिक दिल्लीत दाखल झाले असून, यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे (Maharashtra Sadan) स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील तीन नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.
सध्या सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे (Sudan conflict) अशांततेचा वातावरण सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Cauvery) मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले. यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे.
थोडक्यात तपशील
केंद्र शासनाचे विशेष पहिले विमान एसवी-3620 जेड्डाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.
महाराष्ट्र सदनाद्वारे तीन नागरिकांना स्वगृही सुखरूप परत पाठवण्यात आले.
सुदानमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.
सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य
दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत तीन नागरिक सुखरूप स्वगृही परतले आहेत.
सुदाननमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना (Resisent commissioner) मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.