@maharashtracity

मुंबई: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पदव्युत्तर पदवी उमेदवारांची बंधपत्रित नियुक्ती थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रथम वर्षाची एकही बॅच अद्याप सुरु झालेली नाही. यातून निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर (Resident medical officers) रुग्णसेवेचा भार वाढला आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील निवासी डॉक्टर संतप्त झाले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून मागण्या करण्यात येत आहेत. या पूर्ण न केल्यास निवासी वैद्यकीय अधिकारी १ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलनाच्या (no work protest) पावित्र्यात असल्याचे बीएमसी मार्ड (MARD) संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील रुग्णालयांमध्ये होणाऱ्या वरिष्ठ निवासी अधिकारी आणि हाऊस अधिकारी यांच्या नियुक्तीवर निर्बंध लावण्यात आल्याने मुंबई शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता निवासी डॉक्टर (Resident doctors) व्यक्त करत आहेत. कोविड कालावधीमध्ये सेवा देणाऱ्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऋण निर्देश भत्ता आणि अनुभव प्रमाणपत्र देखील देण्यात आले नसल्याची तक्रार डॉक्टर मांडत आहेत.

आरोग्य व्यवस्था कायम टिकवून राहण्यासाठी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांना मुंबई मार्डच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मागण्या :

१) बंधपत्रित उमेदवारांची केंद्रीय नियुक्ती लवकरात लवकर सुरु करावी.
२) मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ निवासी आणि हाऊस ऑफिसर यांच्या नियुक्तीबाबत घेतलेला निर्बंध काढावा.
३) पदव्युत्तर पदवी बंधपत्रित उमेदवारांची संख्या वाढवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here