@maharashtracity
ठाणे: विद्यमान महाराष्ट्र सरकारने, नुकताच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला असला; तरी, दिवस-रात्र, उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांना मात्र, दिवाळी बोनस देण्याबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. याच शासकीय उदासीनतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी, समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी, दि. १८ ऑक्टोबर रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर, एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी आवर्जून उपस्थित राहून, पोलिसांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे! या मागणीला ठामपणे पाठींबा दिला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजे म्हाणाले की, “या सरकारात एक मंत्री आहेत, जे फार मोठे बिल्डर आहेत, ज्यांची चाळीस हजार कोटींची ज्ञात संपत्ती आहे, तेच आता पर्यटन मंत्री आहेत. हेच विद्यमान मंत्री जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसत होते, तेव्हा त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पोलिसांना २५ ते ५० हजारांपर्यंत बोनस द्या, अशी मागणी केली होती. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटून गेलीत. हेच मंगलप्रभात लोढा जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसत होते, तेव्हा त्यांना कंठ फुटला होता आणि आता हेच सत्तेत बसल्यावर मात्र, xxx पाय लावून पळतात!” असा जोरदार घणाघात राजन राजे यांनी केला.
राजे पुढे म्हणाले की, “दोन वर्षांत महागाई आणखी वाढल्याने, खरंतर पोलिसांना ३० ते ६० हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे. आता तर तुमचं बोगस, ढोंगी, बनावट हिंदुत्ववादी सरकार आहे, मग तुम्हाला अडवलंय कोणी? असा थेट प्रश्नदेखील राजे यांनी, यानिमित्ताने आपल्या भाषणात शिंदे-भाजप सरकारला विचारला. आपल्या प्राणांची पर्वा न करता, कुटुंबासह सणवार साजरे न करता, कर्तव्यभावनेने आपले पोलीस कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या हक्काचा बोनस देण्यात यावा, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर यांनी, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
परिणामी, आम्ही पोलिसांच्या बोनसप्रकरणी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्या घणाघाती भाषणात सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधताना राजन राजे पुढे म्हणाले की, “गेल्यावर्षी ७५० रुपयांची रक्कम, एखादी भीक देतात तशी बोनस म्हणून देण्यात आली होती. पोलिसांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसून त्यांचा अपमान करण्यात आला होता. आमची खाकी जर, फिकी पडून द्यायची नसेल तर, त्या वर्दीचा आत्मसन्मान हा राखला गेलाच पाहिजे. शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात; मात्र आम्ही त्यांना बोगस-बनावट हिंदुत्ववादी मानतो. याच ढोंगी ‘ईडी’ सरकारला ठामपणे सांगायचंय की, प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून जेव्हा आयोध्येत परत आले, तेव्हा त्यांनी भरताला दोन प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की, आपल्या राज्यातील जनता सुखी आहे ना? आणि दुसरा प्रश्न होता, आपल्या राज्यातील सेवकांना चांगलं वेतन मिळतंय ना? हाच प्रश्न जर, आधुनिक रामाने इथे येऊन विचारला तर, त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? त्यांना आम्ही सांगायचं का, आमच्या पोलिसांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झालीय आणि तरीदेखील तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घ्यायचं?
राजे म्हणाले की, हे जे काही चाललंय, ते सगळं बोगस आहे. मंगलप्रभात लोढा यांनी वल्गना केल्याप्रमाणे जर, पोलिसांना बोनस दिला गेला तर, आम्ही स्वतः त्यांना हार-तुरे घालून त्यांचा सत्कार करु. उगाच तोंडाच्या बाता नाही करायच्या, उगाच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घ्यायचं नाही आणि आता जर तुम्ही पोलिसांना बोनस दिला नाहीत; तर, हे सिद्ध होईल की, तुमचं सरकार बोगस आणि ढोंगी आहे. दहशतवादी कसाबचा काळ असो किंवा काल-परवाचा कोरोनाचा असो, पोलिसांनी तुमच्या-आमच्या रक्षणासाठी निधड्या छातीने मुकाबला केलेला आहे. शेकडो पोलिसांचा त्यात बळी गेलेला आहे आणि म्हणूनच आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या पोलिसांना, त्यांचा न्याय्य-हक्क पोहोचतो. त्यांना हा बोनस दिला गेलाच पाहिजे, अन्यथा आम्हाला कायदेशीर आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल!” असा इशारादेखील राजन राजे यांनी, शिंदे-भाजप सरकारला दिला.
याप्रसंगी, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी व नरेंद्र पंडित या पदाधिकाऱ्यांसह, नरेंद्र शिंदे आणि अजय जेया हे कार्यकर्ते आणि समाजसेविका अश्विनी केंद्रे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.