खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण
@maharashtracity
मुंबई: रघुनाथ नेत्रालयात डोळ्याच्या विकारांवर सर्व प्रकारच्या तपासण्या, नवीन प्रकारच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, रेटिना शस्त्रक्रिया, बुब्बुळाच्या, डोळ्याच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या आजाराच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. ५० टक्के चॅरिटीने शस्त्रक्रिया आणि उपचार केले जाणार असून ५० टक्के चॅरिटी म्हणजे ना फायदा ना तोटा तत्वावर धर्मादाय पद्धतीने उपचार केले जाणार असल्याचे नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane) यांनी सांगितले.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबईतील रघुनाथ नेत्रालयाचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते बुधवारी सकाळी उद्घाटन झाले. त्यानंतर डॉ. लहाने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. डॉ. लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयामध्ये मोतीबिंदू, कॉर्निया, रेटिना, ऑक्युलोप्लास्टीया यासारख्या डोळ्यांच्या व्याधींवर उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने यांचे वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान असून यापुढेही रघुनाथ नेत्रालयाच्या माध्यमातून असेच काम करत राहतील, असा विश्वास उद्घाटनावेळी शरद पवार पवार यांनी व्यक्त केला. तर भविष्यात डॉ. लहाने यांनी नेत्रशल्यचिकित्सक विषयात पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केले.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) ‘माझी शाळा, सुरक्षित शाळा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी, मानसिक आरोग्य, मधुमेह तपासणी करण्यात येत असून आगामी काळात डोळ्यांची तपासणी करण्यासाठीही डॉ. लहाने यांनी पुढाकार घ्यावा, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यावेळी म्हणाले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.