अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी बील सहा हप्त्यांत भरण्याची वीज तज्ज्ञांची सुचना
@maharashtracity
मुंबई: महावितरण (Mahavitaran) कंपनीने राज्यातील वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणीची संपूर्ण रक्कम लागू केल्याने वीज ग्राहकांमध्ये (power consumers) संभ्रम वाढला आहे. यावर ज्या ग्राहकांना एक रकमी भरणा शक्य नसल्यास ती सहा हप्त्यांत भरावी, तसेही शक्य नसल्यास प्रीपेड मीटरची मागणी करावी म्हणजे कोणतीही सुरक्षा ठेव (security deposit) भरावी लागणार नाही. शिवाय ५ टक्के वीजदर सवलतही मिळेल, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे (Pratap Hogade) यांनी सुचवले आहे.
महावितरणने अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट केली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) ही रक्कम भरण्यासाठी विनियमांमध्ये सहा हप्त्यांची सवलत दिलेली आहे. तसेच महावितरणने ग्राहकांकडे एकरकमी संपूर्ण रकमेची मागणी बिले लागू केली आहेत. यावर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर कंपनीने ग्राहकांना सहा हप्त्यांत रक्कम भरता येईल, असे एसएमएस पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे एसएमएस सर्व ग्राहकांना पोहोचले नसल्याने परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संघटनेच्या ग्राहकांना सूचना
ज्या ग्राहकांना शक्य असेल, त्यांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव मागणी रक्कम एकरकमी भरावी. ज्यांना एकरकमी भरणा शक्य नाही, अशा ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरणा करण्यासाठी विनियमांनुसार ६ हप्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे ही रक्कम ६ समान मासिक हप्त्यांत भरता येईल. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात अडचण येणार नाही. तशा सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.