@maharashtracity
मुंबई: अग्निशमन दलाचे वडाळा येथील केंद्र लवकरच कात टाकणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थापत्य समितीच्या ( शहर) बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
वडाळा येथे मुंबई अग्निशमन दलाचे प्रादेशिक समादेश केंद्र परिमंडळ -२, परिमंडळ ५, वडाळा प्रशिक्षण केंद्र आणि वडाळा अग्निशमन केंद्र (fire brigade) इत्यादी महत्वाची कार्यालये आहेत. याठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने व जलतरण तलाव आहे.
या अग्निशमनदलाच्या नजीकच झोपडपट्टी आहे. अग्निशमनदल केंद्राच्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वसाहत व अग्निशमन केंद्र असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात आले आहे.
या वडाळा अग्निशमन केंद्र परिसरातील कुंपण भिंतीलगत दिव्याचे खांब व भिंतीवर दिवे आणि वीज विरोधक यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसविण्यात येणार आहेत.
या अग्निशमन दलाच्या केंद्राचे अधुनिकीकणाचे काम मेसर्स चैत्रा इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग या कंत्राटदाराला पालिका, कार्यालयीन अंदाजित कंत्राट रकमेच्या ३.०६% कमी दराने कंत्राट काम देणार आहे.
याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर व त्याबाबतची वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील ९ महिन्यात अग्निशमन दलाचे अद्ययावत करण्याचे काम या कंत्राटदाराला (contractor) देण्यात येणार आहे.
त्यासाठी पालिकेला १ कोटी ५१ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याच कंत्राटदाराला या अग्निशमनदल केंद्राची देखभाल पुढील ५ वर्षे करायची आहे.