@maharashtracity

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून केली जागा अंतिम

पालघर: ठाणे शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहराच्या वेशीवर तात्पुरते पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांनी घेतला. त्यानंतर उरण, जेएनपीटी, खारेगाव, सोनाळे, दापोडी याप्रमाणेच आता पालघर आणि ठाण्याच्या सीमेवरील दापचारी येथेही पार्किंग प्लाझासाठी जागा अंतिम करण्यात आल्या आहेत. (Parking plaza at Dapchari)

श्री. शिंदे यांनी गुरुवारी या भागाचा दौरा करून या जागा अंतिम केल्यानंतर लागलीच या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूककोंडी (traffic congestion in Thane) वाढल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत होता. रस्त्यांवरील खड्डे, विकासकामे यामुळे या वाहतूककोंडीत भर पडली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत होते. हेच चित्र बदलण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत दापचारी गावातील दोन जमिनी या पार्किंग प्लाझासाठी निश्चित करण्यात आल्या. यातील पहिली जमीन सात एकर, तर दुसरी जमीन चार एकर आहे. या दोन्ही शासकीय जमिनी आहेत.

याठिकाणी अहमदाबाद येथून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवून त्याचे नियोजन करून ती पुढे पाठवण्यात येतील. पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलिस अधीक्षक याबाबतचे नियोजन करणार आहेत.

या जागांचे तातडीने सपाटीकरण करण्याचे निर्देश आज श्री. शिंदे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिले. यासाठी गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा प्रशासनाशी बोलणे झाले असून त्यांनीही या वाहनांचे नियमन करण्यासाठी उचित सहकार्य करायला होकार दिला आहे.

या माध्यमातून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून ठाणेमार्गे जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहनांचे नियमन करणे शक्य होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरातील वाहतूककोंडीला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी अवजड वाहनांची संख्या हे देखील प्रमुख कारण असल्याने या वाहनांचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ती शहरात सोडण्याचा निर्णय वाहतूक विभागासोबत घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

त्यानुसार सिडकोच्या (CIDCO) ताब्यातील १०० हेक्टर जमिनीवर पार्किंग प्लाझा उभारणे, जेएनपीटी (JNPT) येथील अवजड वाहनांचे स्टिकर्स लावून नियमन करणे. तसेच सिडको, जेएनपीटी, रायगड पोलिस यांच्या माध्यमातून या अवजड वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी काल, बुधवारी दिले होते.

तर खरेगाव टोलनाका येथेही भूखंड अंतिम करून सपाटीकरणाच्या कामाला काल सुरुवात झाली. मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे, दापोडी आणि भिवंडी-मनोर मार्गावरील ग्रामीण पट्ट्यातील पार्किंग लॉटसाठी उपलब्ध असलेल्या जागांची पाहणीही श्री. शिंदे यांनी केली होती.

दापचारी येथे आज श्री. शिंदे यांनी पाहणी करून जागा निश्चित केल्या. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here