@maharashtracity
नायरमधील परिचरिकांना जेवण, चहापान पुरविणाऱ्या कंत्राटदाराला २ वेळा मुदतवाढ
अडीच वर्षात मूळ कंत्राट रक्कम ४.१६ वरून ७.०८ कोटींवर
कारणे न देता २.८२ कोटींची खैरात
मुंबई: मुंबई महापालिका (BMC) प्रशासन जर मेहेरबान असेल तर कंत्राटदार कसा पहेलवान बनतो, कोट्यवधी रुपयांची खैरात कशी मिळवतो याचे उत्तम उदाहरण नायर रुग्णालयात (Nair Hospital) बघायला मिळत आहे.
नायर रुग्णालयातील निवासी व अनिवासी परिचरिकांना जेवण, नाश्ता, चहा यांचा दैनंदिन पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला (contractor) तीन वर्षांसाठी दिलेल्या कंत्राटाची मुदत दोन वेळा वाढवून थेट साडेपाच वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटकामाची मूळ रक्कम ४ कोटी १६ लाखांवरून थेट ७ कोटी ८ लाख रुपयांवर गेली आहे. (BMC favored contractor)
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार असून या प्रस्तावावर पहारेकरी भाजप (BJP) व विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर प्रस्तावावर जोरदार चर्चा झाल्यास प्रसंगी जेवण व चहा यांना भलतीच ‘ उकळी’ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पालिकेच्या नायर रुग्णालयात कार्यरत २८७ निवासी परिचारिका यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि ८०० अनिवासी परिचारिका यांना चहा पुरवठा करण्याचे ३ वर्षांचे (१/६/२०१६ ते ३१/५/२०१९) कंत्राटकाम मे. चेरुत्तम या कंत्राटदाराला देण्यात आले होते.
त्यासाठी कंत्राटदार जेवण, नाश्ता यासाठी प्रति परिचारिका प्रति थाळी ९० रुपये तर चहा पुरवठा करण्यासाठी प्रति परिचारिका प्रति कप ६ रुपये दर आकारात होता. यासाठी पालिकेने कंत्राटदाराला ३ वर्षांसाठी ४ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये मोजले.
मात्र, त्यानंतर पालिकेने पुन्हा एकदा त्याच दरात त्याच कंत्राटदाराला २ वर्षांसाठी मुदतवाढ दिली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर त्यापोटी आणखीन २ कोटी ३५ लाख ९९ हजार रुपयांचा भार वाढला.
हे कमी होते की काय पुन्हा त्याच कंत्राटदाराला तेच जेवण, नाश्ता, चहा यांचा पुरवठा करण्याचे कंत्राटकाम ६ महिन्यांसाठी वाढवून दिले. त्यामुळे पालिका तिजोरीवर पुन्हा एकदा ५६ लाख ५ हजार रुपयांचा बोजा पडला.
त्यामुळे मूळ ३ वर्षांसाठी दिलेले कंत्राटकाम आणखीन अडीच वर्षांची मुदतवाढ मिळाल्याने वाढून थेट साडेपाच वर्षांवर गेले. त्यामुळे कंत्राटकामाची एकूण रक्कम ४ कोटी १६ लाख रुपयांवरून थेट ७ कोटी ८ लाख रुपयांवर गेली आहे.
एकूण कंत्राटकामात झालेल्या अडीच वर्षांची आणि २ कोटी ९२ लाख रुपयांची वाढ धक्कादायक असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.