@maharashtra.city
मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ८१.६१ लाख लस उपलब्ध करून देण्यात आली असून त्यातून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १७५७ गावातील ३६.६० लाख पशूधन आणि परिघाबाहेरील १०.७० लाख पशूधन अशा एकूण ४७.३० लाख पशूधनास मोफत लसीकरण (vaccination of cattle) करण्यात आले आहे.
अशा तऱ्हेने राज्यामध्ये शनिवारपर्यंत ३० जिल्ह्यांमधील १,७५७ गावांमध्ये फक्त २१,९४८ जनावरांमध्ये लंपी चर्म रोगाचा संसर्ग (lumpy skin disease) दिसून आला. यापैकी ८०५६ पशूधन उपचाराने लंपी मुक्त झाले असल्याची माहिती पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. उर्वरीत बाधित जनावरांवर उपचार सुरु असल्याचे सिंह यांनी सांगितले.
गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशूधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू असून राज्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच लस उपलब्ध करून देण्यात आली असून राज्यातील सर्व म्हणजे ४,८५० पशूवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लंपी चर्म आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशूवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासिता छात्र यांना प्रती लसमात्रा रु. ३ प्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व खासगी पशूवैद्यकीय व्यावसायिकांनी (veterinary doctors) सेवादात्यांनी तसेच पशूसंवर्धन विभागातील तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आले. सरकारी तसेच खाजगी पशूवैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा सूचनाही सिंह यांनी दिल्या.