दादर चौपाटी, माहीम रेतीबंदर येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे पालिकेचे आवाहन
@maharashtra.city
मुंबई: मुंबईकरांचे लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन लवकरच होणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने शहर व उपनगरात जोरदार पूर्व तयारी केली आहे. एफ/ उत्तर विभाग पालिका प्रशासनाने शीव, चुनाभट्टी परिसरातील तलावात केवळ घरगुती श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन गणेश भक्तांना केले आहे. तर दादर चौपाटी, माहीम रेतीबंदर येथे मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत पालिकेकडून कडक उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
महापालिका क्षेत्रात श्रीगणेश विसर्जनासाठी ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळी तर १६२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये एक महत्त्वाचे विसर्जन स्थळ म्हणजे शीव परिसरात असणाऱ्या एन. एस. मंकीकर मार्गालगतचा तलाव आहे.
‘सायन तलाव’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या तलावात दरवर्षी शीव, चुनाभट्टी इत्यादी नजिकच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करीत असतात. तथापि, तलावाची भौगोलिक वैशिष्ट्ये, परिस्थिती व तलावातील जलचर इत्यादी बाबी लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवापासून या तलावात मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करु नये, अशी विनंती ‘एफ /उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी केली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी व नागरिकांनी मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन ‘सायन तलाव’ येथे करु नये. या तलावात केवळ घरगुती श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच ही सुविधा रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. मोठ्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पर्यायी विसर्जन स्थळ म्हणून मोठ्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन हे दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर येथे करावे, असे आवाहन ‘एफ/ उत्तर’ विभागाद्वारे करण्यात आले आहे.