@maharashtracity

सुलभ तांत्रिक सोयींच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निवड

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Mhada) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने सोमवार दि. ३१ जानेवारी २०२२, दि. ०१ फेब्रुवारी, २०२२, दि. ०२ फेब्रुवारी, २०२२, दि. ०३ फेब्रुवारी २०२२, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२, दि. ०८ फेब्रुवारी २०२२ व दि. ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

सुलभ तांत्रिक सोयींच्या उपलब्धतेनुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निवडण्यात आली आहेत. तसेच म्हाडाच्या परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर (Rajkumar Sagar) यांनी आज दिली.

ऑनलाईन परीक्षांबद्दल माहिती देतांना सागर म्हणाले की, परीक्षांबाबत अद्ययावत माहितीकरिता सर्व विद्यार्थ्यांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळास नियमितपणे भेट द्यावी. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी, २०२२ पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. २६ जानेवारी, २०२२ पासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.

त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून, या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका व Answer Key बाबत काही आक्षेप असतील तर आपला आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरकरिता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली आहे, त्या क्लस्टरकरिता Normalisation process (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_2021-dtd-14-1-2022.pdf) पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सागर यांनी दिली आहे.

कोविडच्या (covid) पार्श्वभूमीवर परीक्षा घेताना म्हाडाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. एखाद्या उमेदवारास कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात (isolation room) बसविण्याची सोय करण्यात आली आहे. म्हाडा सरळसेवा परीक्षा संपूर्णपणे पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरतीमध्ये निव्वळ गुणवत्ताधारक व निकषांच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक व्हावी, याकरिता सर्व खबरदारी म्हाडा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती सागर यांनी दिली.

म्हाडा प्रशासनाद्वारे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सरळ सेवा परीक्षा (direct recruitment exam) प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकरित्या राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या/मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये. अशा प्रकारे जर कोणी प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींची तक्रार म्हाडा प्रशासन, म्हाडा दक्षता व सुरक्षा विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात करावी.

म्हाडा सरळ सेवा भरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here