@maharashtracity

पोयसर नदीचे १,४८२ कोटींत पुनरुज्जीवन

कंत्राटदारांना १५ वर्षांसाठी नदी परिरक्षण व प्रचालन कामे

कंत्राटकामाच्या अंतर्गत वीज वापरावर होणार ११९ कोटींचा खर्च

पालिकेचा अंदाज ५४० कोटींवरून ९३४ कोटींवर जाऊनही चुकला

मुंबई: मुंबईत मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवरा/वालभट नद्या आहेत. त्यापैकी मिठी नदी पाठोपाठ आता पोयसर नदीलाही प्रदूषण मुक्त करण्यासाठी व नदीच्या १५ वर्षांसाठी परिरक्षण कामांसाठी मुंबई महापालिकेने मे. एबीएल – जीइएल – इएनए ( जेव्ही) या कंत्राटदारांना तब्बल १ हजार ४८२ कोटी रुपयांचे कंत्राटकाम देण्याचा निर्णय घेतला आहे.

आश्चर्याची व धक्कादायक बाब म्हणजे या कंत्राटदारांनी यापूर्वी राजस्थान व पुणे येथे यासंदर्भातील केवळ ३५ – ३७ कोटींची कामे केलेली असताना या कंत्राटदारांना तब्बल १ हजार ४८२ कोटींची कामे देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. दुसरे म्हणजे हे कंत्राटदार नदीला प्रदूषणमुक्त करणे, नदीचे पुनरुज्जीवन करणे आदी कामांसाठी १५ वर्षाच्या कालावधीत तब्बल ११९ कोटी रुपये वीज वापरावर खर्च करणार आहे. हा खर्च पालिका करणार असून तो कंत्राट कामात अंतर्भूत आहे. मात्र त्यापुढील वीज वापरावरील खर्च कंत्राटदाराने करणे अपेक्षित असणार आहे.

पालिकेचा अंदाज ५४० कोटींवरून ९३४ कोटींवर जाऊनही चुकला

मुंबई महापालिकेने पोयसर नदीच्या (rejuvenation of Poisar river) पुनरुज्जीवनाच्या कामासाठी अगोदर अंदाजे ५४० कोटी रुपये खर्च गृहीत धरला होता. मात्र टेंडरला (tender) प्रतिसाद न लाभल्याने पुन्हा खर्च अंदाज बदलला व तो थेट ७५१ कोटी ६९ लाख रुपयांवर गेला.

त्यानंतरही टेंडरला (bid) अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने खर्च आणखीन ९३४ कोटी १५ लाख रुपयांवर गेला. त्यामुळेच की काय एक सोडून चार – चार कंत्राटदार पुढे आले. मात्र कंत्राटदाराने त्यावर समाधान न मानता त्यांनी १५ वर्षांचा वीज वापर (electricity charges) व त्यासाठीचा खर्च ११९ कोटी रुपये लावून हा खर्च थेट १ हजार २१० कोटी १५ लाख रुपयांवर नेला.

Also Read: उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी ७० कोटींचे कंत्राट

त्यावर पालिकेनेही नाईलाजाने मान्यता देत कंत्राट मे. एबीएल – जीइएल – इएनए ( जेव्ही) या कंत्राटदारांना (ABL -GEL -ENA) तब्बल १ हजार ४८२ कोटी रुपयांचे कंत्राटकाम (contract) देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोयसर नदीची माहिती

पोयसर नदी संजय गांधी उद्यानातून (SGNP)उगम पावते. ती पुढे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे ओलांडून पुढे मालाड खाडीमध्ये (Malad Creek) विसर्जित होते. पोयसर नदीची एकूण लांबी ११.१५ किलोमीटर व रुंदी उगमस्थानी १० मिटर असून ती पातमुखापर्यंत ४५ मिटरपर्यंत बदलत जाते. ही नदी १९२८ हेक्टर पाणलोट क्षेत्र (catchment area) असलेल्या पाणलोट क्रमांक २११ मध्ये वाहते.

नदीला प्रदूषित करणारे नाले

पोयसर नदीत कमला नेहरू नाला, जोगळेकर नाला, पीएमजीपी नाला, समतानगर नाला, गौतम नगर नाला इत्यादी विविध नाल्याचे पाणी सोडण्यात येते. तसेच, या नदीत नजीकच्या झोपडपट्टीतून, सोसायटीमधून मल:मिश्रित सांडपाणी नदीत प्रवाहित होत असते. एवढेच नव्हे तर या नदीत नजीकच्या तबेल्यातील शेणमिश्रित पाणीसुद्धा प्रक्रियाविना सोडण्यात येते. त्यामुळे नदी प्रदूषित होते.

केंद्र सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board – MPCB), हरित लवाद (National Green Tribunal – NGT), न्यायालये आदींनी मुंबईतील प्रदूषित नद्यांमधील प्रदूषण बंद करून नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी वेळीवेळी पालिका प्रशासन यांचे कान उपटले आहेत.

कंत्राटदार करणार असलेली कामे

पालिका कंत्राटदारांकडून, नदीला प्रदूषण करणारे सांडपाणी, मलयुक्त पाणी रोखणे, त्यासाठी १३ ठिकाणी इंटरसेप्टर बसविणे, नदी लगतच्या झोपड्पट्टीत मलनि:सारण वाहिन्या टाकणे, मलजल उदंचन केंद्राकडे वळविणे, त्यावर प्रक्रिया करून मगच ते पाणी पुन्हा नदीत सोडणे.

नदीलगत सेवारस्ते बांधणे ( ३,१५३ मी.) नदीलगत पर्जन्य जलवाहिन्यांचे ९,२१० मी. बांधकाम करणे, नदीलगत मलनि:सारण वाहिन्यांचे ८,६६७ मी. बांधकाम करणे, १० ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र , वेट वेल आणि पंपिंग व्यवस्था करणे आदी कामे करणे बंधनकारक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here