दुरुस्तीसाठी आंबेत पूल बंद
@maharashtracity
महाड (रायगड): महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील (Savitri River) तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आलेले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर या तिन्ही पुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये या पुलांच्या पायामध्ये दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामध्ये आंबेत पुलाचा एक पिलर झुकल्याने याची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जाणार आहे. याठिकाणी असलेली पाण्याची खोली आणि भरती ओहोटीची स्थिती यामुळे हे एक आव्हानच असून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णवेळ बंद ठेवण्यात आला आहे.
महाड (Mahad) जवळील सावित्री नदीवरील पूल सन २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण (Inspection of bridges) करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक सन १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगाव मधील आंबेत पुलाचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
या पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणाऱ्या एजन्सीने सुचवले. त्यानुसार आंबेत पुलाकरिता साडे नऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडे सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. यातील आंबेत हा पूल रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणारा आहे.
आंबेत पूलाचे काम १९७२ ला सुरु करण्यात आले तर १९७८ ला पूर्ण झाले आहे. या पुलाचे आयुष्यमान ५० वर्षाचे असले तरी सातत्याने होणारी अवजड वाहतुक, अतिवृष्टी, आणि यापूर्वी झालेली वाळू उत्खनन यामुळे हा पूल ४३ वर्षातच कमकुवत झाला. या पुलाची लांबी ३७६ मीटर असून ४८ मीटरचे २ तर ५६ मीटरचे ५ असे एकूण सात गाळे आहेत.
आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती सुरु असतानाच डिसेंबर २०२१ मध्ये पुलाचा पाया क्रमांक ५ झुकल्याचे निदर्शनास आले. पुलाचा पाया किती झुकतो हे पाहण्यासाठी निरीक्षण केले जात आहे. या पिलरला तडे गेल्याचे दिसून आले. यामुळे १४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा पूल वाहतुकीस पूर्ण बंद करण्यात आला. हि सर्व वाहतूक महाड मार्गे वळवण्यात आली आहे.
दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल बेअरिंग पद्धतीचे आहेत. या पुलांना जवळपास ४० वर्ष झाली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यावेळी खा. सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव श्री.साळुंखे, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
पुलाची दुरुस्ती होईपर्यंत रो रो सेवा सुरु करण्यात येईल असे सांगून रो रो सेवा मोफत सुरु केली आहे. पुलाच्या पिलरचे काम पाण्याखाली केले जाणार आहे. पिलर पाईप फौंडेशन करून त्यावर कॅप बसवून गर्डर रेस्ट केले जाणार आहे. या कामाचे डिझाईन केले जाईल. त्यानंतर डिझाईन मंजुरी आणि पुढे प्रशासकीय मंजुरी या कामाला वेळ लागणार असून यावर्षी हे काम होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी खाडीची खोली जवळपास ६५ ते ७० फुट असल्याने आणि येणाऱ्या भरती ओहोटीच्या काळात हे काम केले जाणार आहे. असे जिकरीचे काम केले जाणार असल्याने आंबेत पुलाची दुरुस्ती एक आव्हानच आहे.
“आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल बंद ठेवण्यात आला आहे. या पुलाच्या झुकलेल्या पिलारच्या कामासाठी प्रस्ताव तयार केला असून मंजुरी मिळताच काम सुरु केले जाणार आहे”.
– शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता – माणगाव
खासदार सुनील तटकरे यांचे मोठे योगदान
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीकरिता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात तात्काळ बैठकीचे आयोजन करून रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्याच बरोबर आंबेत पूल दीर्घकाळ बंद राहणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची व नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता मोफत फेरीबोट सेवा राज्यात प्रथमत: घेण्याचा निर्णय घेतल्याबाबत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांबरोबरच प्रवासी वर्गाकडून खासदार सुनील तटकरे यांना धन्यवाद देण्यात येत आहेत