राष्ट्रवादी सत्तेत असून अडचण!
By मिलिंद माने
@maharashtracity
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मध्यस्थीने राज्यात शिवसेना- काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षाचा कालावधी उलटला आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादीचे (NCP) दोन मंत्री तुरुंगात गेल्यानंतर पक्षातील मंत्री सरकारमध्ये असून देखील अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) व जयंत पाटील (Jayant Patil) वगळता पक्षाची बाजू सावरणारा तगडा नेता राष्ट्रवादीत नसल्याने शरद पवार यांना आता पावलोपावली खासदार सुनील तटकरे यांची गरज लागत आहे. सुनील तटकरे यांना दिल्लीत पाठवण्यास नको होते, अशी खंत त्यांच्या मनात वारंवार जाणवत असल्याचे राष्ट्रवादीमधील एका जाणकार व्यक्तीने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
रायगड (Raigad) लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह दस्तरखुद्द शरद पवार यांनी घेतल्यानंतरदेखील लोकसभा लढविण्यास सुनील तटकरे त्यावेळी नाखूष होते. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी लोकसभेकरता रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व त्यांची मुलगी कुमारी आदिती तटकरे हिला निवडणुकीकरिता उमेदवारी द्यावी, असे तटकरे यांनी पवार यांना सुचविले होते. मात्र पवार यांनी तूच निवडणूक लढ, असा आग्रह धरल्याने नाईलाजास्तव सुनील तटकरे यांना खासदारकीची निवडणूक लढवावी लागली. त्यात त्यांनी पंधरा वर्षे खासदार राहिलेल्या शिवसेना नेते अनंत गीते (Anant Gite) यांचा पराभव केला.
रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी आजमितीस संसदेत रायगड लोकसभा मतदारसंघातील मागील पंधरा वर्ष रखडलेल्या कामांबद्दल आवाज उठविला. पण केंद्रात भाजप सरकार असल्याने मनात इच्छा असूनदेखील अपेक्षित कामे करण्यात अडचणी येत असल्याची खंत त्यांच्या मनात आजही आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत तटकरेंनी मुलीला श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून विजयी करून राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री करून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील पदरात पाडून घेतले.
आज महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाल लोटला. मात्र, दुसरीकडे भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमधील नेत्यांविरुद्ध रोज होणाऱ्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस हतबल झाली आहे. त्यातच अनिल देशमुख (Anil Deshmukh) व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन नेते सध्या तुरुंगात आहेत. तसेच भाजपा नेत्यांच्या दावेदारीमुळे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), अजित पवार, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे ईडीच्या (ED) रडारवर आहेत. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी सातत्याने वाढत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ या नेत्यांवर राष्ट्रवादी पक्षाची मदार आहे. पक्षातील सरकारमधील अन्य मंत्री व राज्यमंत्री सत्तेत असूनदेखील त्यांचा काही उपयोग नाही. कारण भाजपा नेत्यांच्या आक्रमक आरोपांपुढे ते तोंड देण्यास ते सक्षम नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आतून हतबल झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सरकारमधील गृहमंत्री हे महत्त्वाचे पद आहे. मात्र, पूर्वीचे गृहमंत्री यांना गृहमंत्री पदावरून पायउतार होऊन जेलमध्ये जावे लागले. गृहमंत्री पद सक्षमपणे सांभाळणारा आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकही नेता नाही. सध्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील प्रकृती अस्वास्थामुळे कार्यभार सांभाळू शकत नाहीये. त्यामुळे सध्याच्या घडीला गृहमंत्रीपद दुसऱ्या कोणाकडे द्यायचे, असा मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्वी असणारे गणेश नाईक, किसन कथोरे, विजयसिंह मोहिते – पाटील यांनी भाजपाची वाट धरली. तर जयदत्त क्षीरसागर व भास्करराव जाधव हे सध्या शिवसेनेत आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर शशिकांत शिंदेसारख्या मातब्बर नेत्याला विधानसभेत पराभव पत्करावा लागला.
भाजपातून आलेले एकनाथ खडसे यांनाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे पूर्वीसारखे आक्रमकपणे काम करण्यास त्यांना मर्यादा आहेत. त्यातच त्यांच्या पाठीमागे भाजपाने भोसरी भूखंड प्रकरणातील कारवाई चालू केल्याने ते हतबल झाले आहेत. एकंदरीत काय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्याच्या घडीला आक्रमकपणे सरकारची बाजू हाताळणारा व पक्ष वाढीस प्राधान्य देणारा एकही मास लीडर नेता नाही. याचे शल्य शरद पवारांना वेळोवेळी जाणवत असावे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला दिल्लीत पाठवल्याने महाराष्ट्रात पक्षाची बाजू सक्षमपणे सांभाळणारा व सरकारमध्ये समन्वय साधणारा दुसरा व्यक्ती नसल्याने आत्ताच्या सध्या घडीला दस्तरखुद्द शरद पवार हे वेळोवेळी सुनील तटकरे यांना बरोबर घेऊन फिरत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तसेच पक्षाची बाजू मांडण्याचे काम व महत्वाचे सल्ला देण्याचे काम रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडूनच होत आहे.
सुनील तटकरे आमदार असते तर ते गृहमंत्री पदावर विराजमान झाले असते. त्यातच सुनील तटकरे यांना राजीनामा देऊन महाराष्ट्रात पुन्हा मंत्री करायचे झाल्यास रायगड लोकसभा मतदारसंघ हा विचित्र मतदारसंघ असल्याने त्यासाठी पुन्हा सक्षम उमेदवार शोधणे व निवडून आणणे यासाठी तारेवरची कसरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे. ही जोखमीची जबाबदारी पक्ष घेण्यास तयार नाही.