‘कापा’ व ‘एक्सई’ उपप्रकाराने प्रत्येकी एक रुग्ण बाधित

एका बाधित महिलेचा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दुर्दैवी मृत्यू

२१ ते ४० वर्षे वयोगटातील ९५ रुग्ण (४१ टक्के)

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारणअंतर्गत (genome sequencing) केलेल्या अकराव्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. मुंबईतील २३० नमुन्यांपैकी २२८ नमुन्यात ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) २२८ रुग्ण तर ‘कापा’ व ‘एक्सई’ या उपप्रकाराने प्रत्येकी एक रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, २३० संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा (४७) लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत रुग्णाचा पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत कोविडच्या संसर्गावर (covid under control) बऱ्यापैकी नियंत्रण आल्याने शासनाने यापूर्वी घातलेले कडक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मास्क घालणे ऐच्छिक असले तरी गर्दीच्या ठिकाणी वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईतील २३० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित होता, असे निदर्शनास आले आहे.

त्याचप्रमाणे, २३० पैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. मात्र, दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर
लसीचा एकही डोस न घेतलेले १२ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. सुदैवाने, रुग्णालयात दाखल २१ रुग्णांपैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही.

मुंबई महापालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात (Kasrurba Hospital) स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबईतील नागरिक आहेत.

२३० रुग्णांबाबत निष्कर्ष व वयोगटनिहाय वर्गीकरण

० ते २० वर्षे वयोगट – ३१ रुग्ण (१३ टक्के), २१ ते ४० वर्षे वयोगट – ९५ रुग्ण (४१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगट – ७२ रूग्ण (३१ टक्के), ६१ ते ८० वयोगट – २९ रुग्ण (१३ टक्के), ८१ ते १०० वयोगट – ३ रुग्ण (१ टक्के)

२३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण

ओमायक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)
कापा व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)
एक्सई व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here