हायकल केमिकलवर कारवाईचा प्रस्ताव

@maharashtracity

महाड: महाड शहराजवळून गेलेल्या सावित्री नदीमध्ये (Savitri river) गेल्या महिन्यात श्रीहरी केमिकल्स या रासायनिक कारखान्याचे सांडपाणी जाऊन पाणी प्रदूषित झाले होते. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) विभागीय कार्यालयाने कारखाना बंदची नोटीस (closure notice) बजावली आहे. तर हायकल केमिकल या कारखान्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवला असल्याचे क्षेत्र अधिकारी कुंभार यांनी सांगितले.

ऐन पावसाळ्यात रासायनिक सांडपाणी औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडून नाल्याद्वारे नदीला मिळत असते. गेल्या अनेक वर्षापासून या तक्रारी असूनही त्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. गेल्या महिन्यामध्ये सावित्री नदीमध्ये रासायनिक सांडपाणी जाऊन नदीचे पाणी लालसर झाले होते. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी महाड (Mahad) उप प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Pollution control board) श्रीहरी केमिकल या कारखान्याला बंदची नोटीस बजावली आहे.

दिनांक २६ ते २७ जुलै दरम्यान सावित्री नदीमध्ये रासायनिक सांडपाणी मिसळल्याने पाणी प्रदूषित झाले होते. या प्रकरणी ही कारवाई झाली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही किल्लेदार यांनी श्रीहरी केमिकल हा कारखाना प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ चा कलम ३३ ए, १९८१ च्या कलम ३१ ए अंतर्गत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे टेमघर नाल्याशेजारी असलेल्या हायकल केमिकलला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. जल आणि वायु प्रदूषण प्रकरणी सायकल केमिकलला प्रदूषण नियंत्रण कायदा 33 अ, कलम ३१ आनुसार नोटीस बजावली जाणार असल्याचे क्षेत्र अधिकारी कुंभार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here